मुनावर भगत यांचा पहिला मराठी चित्रपट
सामाजिक आशय असलेल्या ‘निवडुंग’मध्ये आगळी वेगळी प्रेमकथा असून, त्यातील प्रमुख भूमिका भूषण प्रधान आणि संस्कृती बालगुडे यांनी साकारल्या आहेत. या चित्रपटाची कथा मुनावर भगत यांनी लिहिली असून महेंद्र पाटील यांनी पटकथा आणि संवाद लिहिले आहेत.
सामाजिक आशय असलेल्या ‘निवडुंग’ या सिनेमाची नुकतीच घोषणा करण्यात आली असून मीना शमीम फिल्म्स या बॅनरअंतर्गत निर्माते मुनावर शमीम भगत या सिनेमाची निर्मिती करीत आहेत. मीना शमीम फिल्म्स या बॅनरअंतर्गत निर्माते मुनावर भगत यांची ही पहिलीच मराठी निर्मिती आहे.
मुनावर भगत या सिनेमाचे दिग्दर्शन करणार आहेत. यापूर्वी हिंदी चित्रपटसृष्टीत काही यशस्वी निर्मितीनंतर भगत आता मराठीकडे वळले आहेत.
काही वर्षांपूर्वी टिव्हीवर गाजलेल्या ‘पिंजरा’ या लोकप्रिय मालिकेनंतर भूषण आणि संस्कृती ही जोडी ‘निवडुंग’ या सिनेमाच्या निमित्ताने पुन्हा एकदा एकत्र काम करणार आहे. विशेष म्हणजे या मालिकेतील त्यांची सहकलाकार सारा श्रवण सुधा या सिनेमात प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. याचबरोबर अस्ताद काळे, प्राजक्ता दिघे, शेखर फडके यांच्याही या सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.
शशिकांत मिना या सिनेमाचे सहदिग्दर्शक असून एकेन सेबास्टेन या सिनेमासाठी कॅमेरा हाताळणार आहेत. या सिनेमातील गीतांना संगीतकार रफिक शेख संगीतबद्ध करणार आहेत. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात ‘निवडुंग’च्या चित्रीकरणाला सुरूवात होणार असल्याचे निर्मात्यांकडून सांगण्यात आले.