अवधूत गुप्तेंच्या हस्ते संगीत प्रकाशन
सचित पाटील आणि स्पृहा जोशी यांच्यासह स्टारकास्टची भक्कम फौज असलेल्या ‘पैसा पैसा’तील गाणी रसिकांचा पैसा वसूल करतील असा विश्वास संगीत प्रकाशन सोहळ्यात व्यक्त झाला.
“‘पैसा पैसा’ चित्रपटाचे संगीत मराठी चित्रपट संगीत विश्वात जबरदस्त बदल घडवून आणेल. अवघ्या चोवीस वर्षाच्या रॉकस्टार सोहम अजय पाठक या युवा संगीतकाराने दिलेलं संगीत श्रवणीय आहे. तरुणांकडून संगीतात नवनवे प्रयोग होत आहेत आणि त्यात ते सोहमसारख्या मराठी मुलाकडून होत आहेत याचा मला अभिमान आहे. पैसा पैसा हा चित्रपट नक्कीच यशस्वी होईल आणि त्याच्या यशात म्युझिकचा मोठा वाटा असेल,” असे उद्गार दिग्दर्शक अवधूत गुप्ते यांनी संगीत प्रकाशन सोहळ्याच्या निमित्त आयोजित समारंभात बोलताना काढले.
पैसा पैसा या चित्रपटात एकूण तीन गाणी असून त्यातील ‘रात्र माझी मैत्रीण’ हे गाणं प्रख्यात गायक – संगीतकार विशाल दादलानी यांनी गायले आहे. मुंबईच्या नाईट लाईफवर आधारीत हे गाणं आहे. त्याच बरोबर सध्याचा आघाडीचा सुप्रसिद्ध गायक आदर्श शिंदे, अवधूत गुप्ते आणि निती मोहन यांनी इतर गाणी गायली आहेत. दिग्गज गायकांना आपल्या अवीट चालींवर गायला लावणारा युवा संगीतकार सोहम अजय पाठक याने या समारंभात एक रॉकींग गाणं सादर करून माध्यम प्रतिनिधी आणि इतर उपस्थितांची वाहवा मिळवली.
डॅशिंग हिरो सचित पाटील आणि सर्वांची लाडकी जोशी पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर एकत्र पाहायला मिळणार आहेत. त्यांच्यासोबत अभिनेता मिलिंद शिंदे, आशिष नेवाळकर, पुष्कर श्रोत्री, दीपाली सय्यद, राजेंद्र चावला, पंकज विष्णू, माधव अभ्यंकर, विनिताजोशी, विकास पाटील आदी कलाकारांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत.
वेळ वाकडी येते तेव्हा घराचे वासे पण फिरतात, असं म्हणतात. आणि त्याचा प्रत्यय कधीनाकधी येतोच. प्रेम, मैत्री, नातेसंबंध, नैतिकता, कर्तव्य आणि पैसा या सर्वांची सांगड घालताना चक्रव्यूहात अडकलेल्या एका तरुणाच्या विचित्र परिस्थितीवर बेतलेला, निर्माता शिवविलाश चौरसिया यांच्या‘ द नाईन फिल्म्स’संस्थेची निर्मिती असलेला‘पैसा पैसा’ हा चित्रपट १३ मे रोजी प्रदर्शित होत आहे.