रोमँटिक लोकेशनवर चित्रित करण्यात आलेल्या या गाण्याच्या लिरिक्स, म्युजिक तसेच कोश्युमवर विशेष मेहनत घेतली असल्याचे गाणे पाहताचक्षणी दिसून येते. भन्साळी शैलीला साजेसे असणा-या या गाण्याला निलेश मोहरीर यांचं संगीत लाभलं आहे. अश्विनी शेंडे लिखित ‘चांद मातला’ हे गाणे स्वप्नील बांदोडकर आणि वैशाली सामंत या जोडगोळीच्या आवाजाने अधिक सुरेल झाले आहे. शिवाय सुजित कुमार यानी हे गाणे कोरियोग्राफ केले आहे.

शबीना खान यांनी सिनेमाच्या सहनिर्मितीबरोबरच या सिनेमाच्या वेशभूषाकार म्हणूनही जबाबदारी सांभाळली आहे. स्वप्नील एका नव्या अंदाजात दिसण्यासाठी वेशभूषाकार शबीना खान यांच्यासोबतच जिमी यांनी घेतलेली विशेष मेहनत या गाण्यात पाहायला मिळते आहे. या गाण्यात स्वप्नील आणि अंजना यांचा हटके लूक आपल्याला दिसून येतो आहे. प्रसाद भेंडे यांच्या कॅमेऱ्याची जादू आपण अनेक सिनेमात पहिली, हीच जादू आपल्याला या गाण्यातसुद्धा पाहायला मिळते. अगदी सहजतेने फिरलेल्या कॅमेऱ्याची कमाल म्हणा की, आपल्याला हे गाणं प्रत्यक्षात अनुभवतो आहोत असा फील येतो.
संजय लिला भन्साळी यांच्या सिनेमात आतापर्यंत पाहायला मिळणारे सीन्स, सेट, कॉश्च्युम, छाया चित्रीकरण तसेच संगीत अशा सगळ्याचबाबतीत असलेला भन्साळी टच या गाण्यातून दिसून येतो आहे.

स्वप्ना वाघमारे जोशी यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं असून शिरीष लाटकर यांनी पटकथा आणि संवाद लिहिले आहेत. या सिनेमात मिलिंद गवळी, प्रिया बेर्डे, स्नेहा चव्हाण, पीयूष रानडे, समिधा गुरु, कमलेश सावंत, जयवंत वाडकर, यशश्री मसुरकर या कलाकारांच्याही भूमिका आपल्याला पाहता येणार आहे. येत्या २७ मे ‘लाल इश्क़’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.