‘पिंडदान’मध्ये साकारली अॅना!
लवकरच प्रदर्शित होणाऱ्या “पिंडदान” या मराठी चित्रपटासाठी मुळची कॅनडीयन असलेल्या पॉला मॅकग्लिन हीने सिद्धार्थ चांदेकर आणि मनवा नाईकबरोबर एकत्रित काम केलं आहे. पॉला कॅनडीयन असली तरी तिला मराठी भाषा आणि संस्कृतीच्या लळा लागला आहे.
‘कोणतीही गोष्ट शिकताना त्या मागील अर्थ मी आधी जाणून घेते मगच ती आत्मसात करायला मला सोपी जाते’, असं पॉला म्हणाली. खरतर इतकी मेहनत एका परदेशी कलाकारांकडून फारशी अपेक्षित नसते . कारण इथे बऱ्याच हिंदीतल्या अभिनेत्यांची मराठीत बोलताना बोबडी वळते. तिथे पॉलाची ही मेहनत वाखाण्याजोगी आहे.
पॉलाने या चित्रपटात अॅना नावाच्या ब्रिटीश मुलीची व्यक्तिरेखा साकारली आहे. जी काही कारणानिमित्त महाराष्ट्रात येते आणि इकडचीच होऊन जाते. तिला हा देश आणि येथील संस्कृती याची उत्सुकता लागलेली असते, त्यामुळे भारतात आल्यावर ती सर्व रूढी आणि परंपरा शिकते.
‘अभिनय करता करता मला कधी ही संस्कृती आपलीशी वाटू लागली हे माझ मलादेखील कळल नाही’, असं सांगत ‘सुरुवातीला मी जेव्हा चित्रपटाचे संवाद वाचले तर ते मराठीत होते. ते मी आधी इंग्लिशमध्ये लिहिले आणि मग वाचू लागले. संवाद बोलताना शब्दांचे उच्चार कसे असावेत याबद्दलच मार्गदर्शन मला वेळोवेळी माझ्या दिग्दर्शकांकडून, मित्रांकडून आणि सह-कलाकरांकडून मिळत गेलं. त्यांच्या मदतीमुळेच मी कॅमेरासमोर न डगमगता संवाद बोलू शकले’, असं पॉलाने सांगितलं. अतिशय चकचकीत आणि उत्तम दर्जाचं प्रॉडक्शन असंच मी ‘पिंडदान’चं वर्णन करेन,’ असंही ती म्हणाली.
बंटी प्रशांत या नव्या जोडीने दिग्दर्शित केलेल्या ‘पिंडदान’ या चित्रपटाचं बरचसं शुटींग ‘फलटण’ तालुक्यात झालं आहे. चित्रपटाचा काहीसा भाग हा फलटणमधील पेशवेकालीन राजवाड्यात झाला आहे. याआधी फलटणमधील एका राजवाड्यात हिंदीत खूप गाजलेल्या ‘बाजीराव मस्तानी’ या चित्रपटाचं चित्रीकरण झालं होतं, त्यामुळे फलटण तालुक्यात असलेल्या पेशवेकालीन राजवाडे आणि वास्तूंची एक प्रकारची भुरळच जणू पॉलाला पडली. त्या वास्तूंबद्दलची संपूर्ण माहिती पॉला चित्रिकरणादरम्यान सतत विचारून घेऊ लागली, असे चित्रपटाचे दिग्दर्शक प्रशांत पाटील म्हणाले.
‘बंटी प्रशांत यांच्याबरोबरच सिद्धार्थ चांदेकर, नवा नाईक अशा कलाकारांसह काम करण्याचा अनुभव फारच धमाल होता. परदेशी कलाकारांना हिंदी किंवा इतर प्रादेशिक भाषातील चित्रपटांत महत्त्वाची भूमिका सहसा मिळत नाही. गाण्यात नाचण्यासाठी किंवा छोट्या भूमिकांसाठी परदेशी कलाकार घेतले जातात. मात्र, ‘पिंडदान’सारख्या अप्रतिम चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारायला मिळणं माझ्यासाठी फारच मोठी गोष्ट आहे,’ असं पॉलानं सांगितलं.