महिलांचे भावविश्व उलगडणा-या सिनेमात स्टारकास्टने भरले रंग

शिवम लोणारी यांच्या ‘शिवलीला फिल्म्स’ची निर्मिती असलेला एका वेगळ्या विषयावरील तजेलदार अनुभव देणारा नीलिमा लोणारी दिग्दर्शित हा चित्रपट आहे. ‘चिनू’, गुलदस्ता’ या सुपरहिट चित्रपटांची निर्मिती करणाऱ्या निर्माते शिवम लोणारी यांचा हा तिसरा चित्रपट आहे.
आजच्या सुशिक्षित महिलांचे भावविश्व उलगडणाऱ्या ‘बर्नी’चे दिग्दर्शन नीलिमा लोणारींच असून त्यांनी यापूर्वी एकूण तीन भिन्न जातकुळीच्या चित्रपटांचे यशस्वी दिग्दर्शन केले आहे. त्यांच्या ‘चिनू’ या चित्रपटाने महाराष्ट्र शासनाचा सर्वोत्कृष्ठ अभिनेत्रीचा पुरस्कार पटकावला आहे. प्रा. सुभाष भेंडे यांच्या ‘जोगीण’ या कादंबरीवरून प्रेरित होऊन ‘बर्नी’ या चित्रपटाच्या कथेचा विस्तार आणि पटकथा नीलिमा लोणारी यांनी लिहिली असून, संवाद सचिन दरेकर यांचे आहेत.
अभिनेत्री तेजस्विनी लोणारी हिने या चित्रपटातील ‘बर्नी’च्या प्रमुख भूमिकेत विशेष रंग भरले आहेत. गोमंतकाच्या निसर्गरम्य परिसरात शांत सुशेगात सरंजामदारीचा प्रभाव असलेल्या खानदानात ‘बर्नी’चा जन्म. उसळत्या रक्ताची, सर्वांशी मिळून मिसळून उत्साही, खेळकर तारुण्याने बहरलेली, मादक, मोहक, अल्लड ‘बर्नी’ कोणालाही हेवा वाटावी… कोणीही तिच्यावर लुब्ध व्हावे… भरपूर शेतीवाडी असणारे तिचे वडील जमीनदार. सैन्यातून निवृत्त होऊन सुखवस्तू जीवन जगात आहेत. आपल्या मुलीची, बर्नीची कोणतीही इच्छा, हौस आनंदाने, पूर्ण करणारी तिची सुंदर सुस्वभावी पोर्तुगीज आई, आकर्षक शेतीवाडी आणि घरदार यात रमलेली.

डीओपी समीर आठल्ये यांची डोळ्याचे पारणे फेडणारी सिनेमेटोग्राफी विशाल निसर्गरम्य गोव्याची सैर घडविते. त्याला तोडीस तोड म्हणजे अमितराजचे गोव्याच्या कल्चरला धरून तयार केलेले संगीत. श्रीरंग गोडबोले यांनी लिहिलेल्या गोवन कल्चरल पार्टी साँगची धम्माल उमेश जाधवच्या नृत्य दिग्दर्शनामुळे अधिक रंजक झाली आहे.
अभिजित देशपांडे यांनी ‘बर्नी’चे संकलन केले असून, कलादिग्दर्शन अनिल वात तर रंगभूषा कुंदन दिवेकर यांनी केली आहे. या चित्रपटाची वेशभूषा नीलिमा लोणारी व चैत्राली डोंगरे यांनी केली असून, पार्श्वसंगीतआदित्य बेडेकर यांनी दिले आहे.
सर्व कलावंतांचा अस्सल अभिनय ही या चित्रपटाची आणखी एक जमेची बाब म्हणता येईल. तेजस्विनी लोणारीचा या भूमिकेसाठी कस लागला आहे. तिचा ‘चिनू’, ‘गुलदस्ता’, ‘वांटेड बायको नं. १’ इत्यादी चित्रपटातला अभिनय आणि ‘बर्नी’तला अभिनय थक्क करणारा आहे. बऱ्याच वर्षांनी नीलकांती पाटेकर पडद्यावर अवतरल्या असून दिग्दर्शिकेने त्यांची केलेली निवड अगदी योग्यच म्हणता येईल.
एक आगळा वेगळा विषय घेऊन नीलिमा लोणारी हा चित्रपट प्रेक्षकांसाठी येत्या १७ जून रोजी येत असून, त्यांच्या या वेगळ्या प्रयत्नांना प्रेक्षक नक्कीच दाद देतील.