गुजरातीत गाजलेलं नाटक मराठी रंगभूमीवर!
गुजरातीत गाजलेले ‘कोडमंत्र’ नाटक आता मराठीत पाहायला मिळणार आहे. या नाटकाचा मुहूर्त नुकताच विलेपार्ले येथील चटवानी सभागृहात झाला. यावेळी निर्माते, दिग्दर्शक व कलाकार उपस्थित होते.

‘कोडमंत्र’ या नाटकाबद्दल मुक्ता बर्वे म्हणाली की, ‘लष्कराच्या पार्श्वभूमीवर हे नाटक आधारित असून सीमेवर घडणार्या घटना व त्या संदर्भात घडणार्या गोष्टी कोडमंत्र नाटकात आहेत. चाळीस कलाकार हे या नाटकाचे बलस्थान आहे. गुजरातीमधील ‘कोडमंत्र’ हे नाटक मी दोन–तीन वेळा पाहिले. मला ते खूप आवडले. तेव्हा वाटले की हे नाटक मराठीत यायला पाहिजे. चांगले प्रयोग मराठीतही होतात, मग हा का नाही? भरत ठक्कर हे गुजराती नाटकाचे निर्माते आहेत. भरतभाई आणि मला एकत्र काम करायचे होते. ते मराठी नाटकाचे खूप मोठे चाहते आहेत. त्यांनी माझी बरीच मराठी नाटके पाहिली आहेत. त्यामुळे माझ्या संस्थेकडे हे नाटक आले. या नाटकातील माझी भूमिका मजेशीर व लक्षवेधी आहे.’
दिग्दर्शक राजेश जोशी म्हणाले की, ‘हे राष्ट्रीय एकात्मतेवरील नाटक असल्यामुळे मराठी, हिन्दी किंवा इतर भाषेतही तितकेच प्रभावशाली ठरेल.’
नेपथ्य प्रसाद वालावलकर, पार्श्वसंगीत सचिन जिगर, प्रकाशयोजना भौतेश व्यास, दिग्दर्शन सहाय्य सूरज व्यास तर प्रसिद्धी दीपक जाधव यांची आहे. येत्या जून महिन्यात हे नाटक रंगभूमीवर येत आहे.