२० मे रोजी प्रदर्शित होणार त्यांचा ‘पैसा पैसा’
अंधेरीच्या रस्त्यांवर हातात कधी भाजी, कोथिंबीर, सणवारांना लागणाऱ्या गोष्टी घेऊन तर कधी दुकानदारांना किटलीतून चहा विकणारा शिवविलाश चौरसिया हा उत्तर प्रदेशातून आलेला छोरा २० मे रोजी प्रदर्शित होणाऱ्या ‘पैसा पैसा’ या मराठी चित्रपटाचा निर्माता आहे….
पानटपरी चालविणाऱ्या वडिलांना ‘कॅन्सर’सारखा दुर्धर आजार झाला आणि एकखांबी तंबू असलेलं चौरसिया कुटुंब अक्षरश: कोसऴलं. औषधोपचारासाठी आवश्यक असलेला पैसा उभा करण्यासाठी मोठ्या भावासोबत किशोरवयीन शिवविलाश शाळेला रामराम ठोकून वाण्याच्या दुकानात काम करता करता रस्त्यावर आरोळी ठोकतभाजी-तरकारी विकू लागला. जमलेले सर्व पैसे औषधपाण्यावर खर्च होत होते आणि भुकेला पाण्यात पाव बुडवून खावा लागत होता. कधी कधी केवळ पाणी पिऊन झोपावं लागत असे. अशातच एका चहाटपरीवाल्याने गावी जायचे असल्याने पाचशे रुपये डिपॉजीट घेऊन आपली चहाटपरी शिवविलाश यांना चालवायला दिली. दुकानदारांना चहा पोहोचवता पोहोचवता एकदा अंधेरीला सुरू असलेल्या हिंदी मालिकेच्या शुटींग सेटवर चहा देण्याचे काम मिऴालं.
कलाकारांना मेकअप करताना पाहण्यात चहा द्यायला आलेला शिवविलाश मग्न होत असे. मेकअपमन दिलीप नायक यांनी एकदा त्याला हटकलं. त्यावर “मुझे ये काम सिखना है|” असं म्हणून निघून जाताना दिलीप नायक यांनी स्वत:चं व्हीजीटींग कार्ड शिवविलाशच्या हातात दिलं. त्या दिवसापासून ते दोन महिन्यांपर्यंत शिवविलाश नायक साहेबांना नजिकच्या पीसीओ वरून रोज फोन लावत असे. पण, उत्तर मिळत नव्हतं. शेवटी कंटाळून शिवविलाश यांनी फोन करणं थांबवलं आणि त्याच दिवशी नायक साहेबांचा त्या पीसीओवर फोन आला. त्यांनी विचारले,“आज फोन क्युं नहीं किया?” त्यावर ‘भूल गया’ असं उत्तर देऊन फोन ठेवणार इतक्यात नायक साहेबांनी “कल मिलने को आ” असा आदेश दिला.
इथे शिवविलाशच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. कलाकारांना मलमल (चेहऱ्यावरचा घाम टिपण्याचा कपडा) देण्याचं काम मिळालं. मलमल देता देता शिवविलाशमधला मेकअप आर्टिस्ट घडत गेला. मलमल देणाऱ्या पोऱ्याचा मेकअपमन झाला. आज शिवविलाश हिंदी टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधील आघाडीचा मेकअप आर्टीस्ट आहे. ‘जस्सी जैसी कोई नही’पासून सुरू झालेला त्यांचा प्रवास ‘इंडीयन आयडल’, ‘नच बलिए’, ‘डान्स इंडीया डान्स’, ‘झलक दिखलाजा’पर्यंत सुरू आहे. गायक-संगीतकार विशाल दादलानी, फरीदा जलाल, अली अजगर, आलोकनाथ आणि अनेक दिग्गज कलाकारांचा तो खाजगी मेकअपमन आहे.
फेरीवाला, चहावाला ते मेकअप आर्टिस्ट असा प्रवास असलेल्या शिवविलाशच्या मनात एक चित्रपट बनविण्याचा विचार घोळत होता. तो त्याने काही मित्रांना बोलून दाखविला. तेव्हा ‘पैसा पैसा’ या चित्रपटाची कथा त्याच्यासमोर आली आणि स्वत:चा जीवनप्रवास त्याच्या डोळ्यासमोर तरळला.
माणूस वाईट नसतो तर वेळ वाईट असते. पण, नितिमत्ता आणि जिद्द कायम असेल तर त्यावरही मात करता येते, हा चित्रपटाचा विषय त्याला भावला आणि ‘पैसा पैसा’ या चित्रपटाच्या निर्मिती प्रक्रियेला सुरूवात झाली. ही गोष्ट गायक-संगीतकार विशाल दादलानी यांना समजताच त्यात एक गाणं कोणताही मोबदला न घेता गाण्याचं त्याने कबूल केलं आणि त्या गाण्याच्या रेकॉर्डींगसाठी यशराज स्टुडियोचे ज्येष्ठ रेकॉर्डीस्ट विजय दयाल यांना स्वत:च्या खर्चाने पाचारण केलं. सध्या म्युजिक चॅनल्सवर गाजणारं ‘ही रात्र माझी मैत्रीण…’ हे ते गाणं. आपल्या मेकअपमनचं निर्माता बनण्याचं स्वप्न पूर्ण होण्यासाठी अनेकांनी शिवविलाश यांना सहकार्य केलंय. त्यात विशाल ददलानी आणि गायिका निती मोहन यांचं योगदान मोठं आहे.
येत्या २० मे रोजी प्रदर्शित होणाऱ्या अभिनेता सचित पाटील, स्पृहा जोशी आणि मिलिंद शिंदे यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘पैसा पैसा’ हा चित्रपट म्हणजे केवळ चित्रपट नसून नशिबाने हाय खाल्लेली असताना, धड शालेय शिक्षणही झाले नसताना केवळ जिद्द, मेहनत आणि नैतिकता जागती ठेवून प्रतिकुल परिस्थितीवर मात करणाऱ्या शिवविलाश चौरसिया या ‘भैय्या’ तरुणाने जात, प्रांत, भाषा हे वाद आणि त्यातून झालेला मनस्ताप बाजूला ठेवून मनोरंजनाच्या माध्यमातून तरुणांपुढे मराठीतून ठेवलेला आदर्श आहे.
