सुब्रतो चौधरी यांच्या रंगलेखनाचे प्रदर्शन सुरु
कोलकातास्थित चित्रकार सुब्रतो चौधरी यांनी अलिकडच्या काळात साकार केलेल्या चित्रांचं ‘फेरी टेल’ हे चित्रप्रदर्शन जहांगीर आर्ट गॅलरी, काळा घोडा, मुंबई येथे दि. १७ मेपासून सुरु झाले असून ते २३ मेपर्यंत सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत सर्व कलारसिकांना विनामुल्य खुलं राहील.
चित्रकार सुब्रतो चौधरी हे नाव कला जगतात सर्वज्ञात आहे.उत्कृष्ट चित्रकारीतेबरोबरच चाहत्यांसमोर कलेचा आविष्कार विषद करणारे म्हणूनही त्यांची ख्याती आहे. अत्यंत मोहक ओळी आणि रेखाचित्र यांच्यावर सुब्रतो यांची हुकमत आहे.चौकटप्रधान चित्रांबरोबरच इजिप्तचे पटल, फ्रेंच प्रभाव आणि मेक्सिकन रंग योजना यांच्या त्यांच्या चित्रांमध्ये समावेश झालेला पहायला मिळतो. चित्र संकल्पना, त्याची अनुभूती आणि त्यात प्रतिबिंबित होणारे दृष्य परिणाम यांचा अनोखा आलेख सुब्रतो चौधरी यांच्या चित्रांमधून पहायला मिळतो.
या वर्षी सुब्रतो चौधरी यांनी पर्या आणि मस्यकन्या असा आगळावेगळा विषय हाताळला आहे. आपल्या सर्वांना परिचीत असलेल्या वातावरणात या पर्या चितारल्या गेल्या आहेत हे या चित्रांच आणखी एक वैशिष्ट्य आहे. मानवी मनाच्या खोल कप्यात दडलेल्या आशा आकांशा पुर्णत्वाला गेल्याचा देखावा काही चित्रांमधून पहायला मिळतो.
कोलकात्याच्या शासकीय कला महाविद्यालयामधून कलेची पदवी प्राप्त केल्यानंतर चित्रकार सुब्रतो चौधरी यांनी अनेक एकल आणि समूह चित्रप्रदर्शनात भाग घेऊन आपली कला रसिकांसमोर पेश केली आहे. त्याना देश विदेशातील अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत.