ख्रिस्ती संस्कृती जाणण्यासाठी तेजस्विनी एका कुटुंबात रमली
आपल्या आवडीची व्यक्तिरेखा साकारण्यासाठी चोखंदळ अभिनेत्री तेजस्विनी लोणारी थेट मुळापर्यंत पोहचते. असाच प्रयत्न १७ जूनला प्रदर्शित होणाऱ्या ‘बर्नी’तील मुख्य भूमिकेसाठी तिने केला आहे. गोव्याच्या सौंदर्यातील देखणी ‘बर्नी’ साकारणारी तेजस्विनी ख्रिस्ती संस्कृती जाणण्यासाठी गोव्याच्या एका कुटुंबात मुक्कामाने राहिली आहे.

मराठी चित्रपटसृष्टीत असलेल्या मोजक्या यशस्वी महिला दिग्दर्शिकांपैकी एक असलेल्या नीलिमा लोणारी सध्या ‘बर्नी’ या आगामी मराठी चित्रपटामुळे चर्चेत आहेत. कोकणी आणि पोर्तुगीज असं मिक्स कल्चर या चित्रपटातून उभं करण्यासाठी नीलिमा लोणारींनीही सर्व पात्रांची अचूक निवड केल्याने चित्रपटातील नाविन्य अधिक खुलून आले आहे.
‘शिवलीला फिल्म्स’च्या बॅनरखाली तयार झालेल्या ‘बर्नी’ या वेगळ्या धाटणीच्या चित्रपटाचं दिग्दर्शन नीलिमा लोणारी यांनी केलं आहे. १७ जूनला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटात अभिनेत्री तेजस्विनी लोणारीने मुख्य भूमिका साकारली आहे. या चित्रपटातील व्यक्तिरेखा साकारताना तिने ख्रिस्ती धर्म-संकृतीचा अभ्यासही केला आहे.

याबाबत ती म्हणाली, ‘या चित्रपटाला गोव्याची पार्श्वभूमी असून, मी यात साकारलेली व्यक्तिरेखा ख्रिस्ती आहे. आजवर मी अशाप्रकारची व्यक्तिरेखा कधीच साकारलेली नसल्याने सुरुवातीला दडपण होतं. हे दडपण दूर करण्यासाठी या कॅरेक्टरचा बारकाईने अभ्यास करायचं ठरवलं. त्याअनुषंगाने ख्रिस्ती धर्म-संस्कृतीचाही अभ्यास करणं क्रमप्राप्त होतं. हे करताना ख्रिस्ती धर्मातील काही ठाऊक नसलेल्या गोष्टींचाही उलगडा होत गेला. पुस्तकीज्ञान मिळवून ‘बर्नी’च्या व्यक्तिरेखेत वरवरचे रंग भरणं मला मान्य नसल्याने मी गोव्यातील एका ख्रिस्ती कुटुंबात जाऊन राहिले. त्यांचं राहणीमान, वागणं, बोलणं, खाद्यपरंपरा, संस्क़ृती यांचा अभ्यास केला. त्यामुळे कॅमेऱ्यासमोर बर्नी साकारणं सोपं गेलं. ‘बर्नी’ ही खेळकर, मनमिळावू, उत्साही, अल्लड असून देखणीही आहे. तिची आई पोर्तुगीज असून वडील सैन्यातून निवृत्त झालेले आहेत. भरपूर शेती असल्याने सुखासमाधानाने जीवन जगत आहेत. ‘बर्नी’ची हौस भागवण्यातच त्याचं समाधान आहे. कॉलेज क्वीन असलेल्या ‘बर्नी’भोवती कायम मित्र-मैत्रिणींचा घोळका असतो. या घोळक्यात असलेला एक तरुण बर्नीवर फिदा होतो आणि तिच्या आयुष्याला कलाटणी मिळते. त्यानंतर बर्नीच्या आयुष्यात अनेक नाट्यमय घटना घडतात. त्यातून ‘बर्नी’ कशाप्रकारे स्वत:ला सावरत समाजासमोर नवा आदर्श निर्माण करते ते या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. या कारणांमुळे पडद्यावर ‘बर्नी’ जिवंत करताना एक वेगळाच अनुभव आला.’
दिग्दर्शनासोबत ‘बर्नी’चा कथाविस्तार आणि पटकथालेखनही नीलिमा लोणारी यांनी केलं आहे. या चित्रपटात कॅमेरामन समीर आठल्ये यांच्या नजरेतून गोव्यातील निसर्गसौंदर्य पहायला मिळणार आहे. बर्नीची शीर्षक भूमिका रंगविणाऱ्या तेजस्विनी लोणारीसोबत अभिनेत्री नीलकांती पाटेकर, राजन ताम्हाणे, भूषण पाटील, गिरीश परदेशी, सविता मालपेकर, किरण खोजे, सुमुखी पेंडसे, मौसमी तोंडवळकर, चैत्राली डोंगरे, राज हंचनालळे, राधिका देशपांडे आदी कलाकारांनी प्रमुख भूमिका केल्या आहेत.