सचिन भनगडे यांच्या रंगलेखनाचे २४ मेपासून प्रदर्शन
सुप्रसिद्ध रंगलेखक सचिन भाऊसाहेब भनगडे यांनी अलिकडे साकारलेल्या चित्रांचं ‘मुंबई मेरी जान’ हे चित्रप्रदर्शन मुंबईत आयोजित करण्यात येत आहे. नेहरू सेंटर आर्ट गॅलरी, डिस्कव्हरी ऑफ इंडीया बिल्डींग, डॉ. ऍनी बेझंट मार्ग, वरळी, मुंबई येथे २४ ते ३० मे २०१६ या काळात सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत सर्व कलारसिकांना विनामुल्य खुलं राहील.

रंगलेखक सचिन भाऊसाहेब भनगडे यांना मुंबईने भुरळ घातली, अहमदनगर जवळच्या धवलपूरी या छोट्याशा गावात जन्म झालेल्या या कलाकाराला मुंबईने आकर्षित केलं. सर्वसमावेषक, मुक्त, घड्याळाच्या काट्यावर चालणारी, कधीही न झोपणारी आणि सतत नव्याचा ध्यास घेतलेली अशी ही मुंबई मग या चित्रकाराच्या चित्रांचा विषय होऊन गेली. जगण्याला गती देणारी, कोणत्याही सीमामध्ये न मावणारी, हाताला काम देणारी अशी ही मुंबई मग कॅनव्हासवर उतरवताना चित्रकाराच्या कुंचल्याचा कस लागला आहे.

छत्रपती शिवाजी टर्मिनस, मुंबई सेंट्रल, नरिमन पॉईंट, महापालिका इमारत, टॅक्सी स्टॅन्ड फ्लायओव्हर, जुने पूल, ओसंडून वाहणारी गर्दी, आकाशाशी स्पर्धा करणार्या इमारती अशा अनेक ठिकाणचा माहोल आणि त्यातला जिवंतपणा या चित्रकाराने नेमका टिपला आहे.
सचिन भनगडे यांनी आजपर्यंत अहमदनगर, पुणे, मुंबई, दिल्ली, उज्जैन, बडोदा, बंगळूरू अशा देशातील अनेक ठिकाणी एकल आणि समुह प्रदर्शनात आपली कला सादर केली आहे. जगभरातील चित्रसंग्रहकांजवळ त्यांची चित्रं पोहोचली असून जलरंगातली कागदावरची आणि ऍक्रिलीक रंगातली कॅनव्हासवरची चित्रं हा या चित्रकाराचा हातखंड विषय आहे.
चित्रकलेच्या प्रेमापोटी या कलाकाराने देशभरात भ्रमंती केली आणि प्रत्यक्ष ठिकाणावरच ती साकार केली. जादुयी नगरी मुंबईचं देखणं रुप आणि तिथे चालणार्या विविध घटनांचं चित्रण पाहण्याची दुर्मिळ संधी या प्रदर्शनाच्या माध्यमातून चालून आली आहे, कलारसिकांनी त्याचा जरूर लाभ घ्यावा.