‘मेट्रो’मध्ये ‘भोली सूरत’वर नृत्त्याविष्कार
‘भगवान आबाजी पालव…’ मुंबईच्या मेट्रो सिनेमात या नावाचा गजर झाला. निमित्त होते ज्येष्ठ अभिनेते भगवान दादा यांच्या जीवनावर आधारीत चित्रपट ‘एक अलबेला’च्या टीझर लाँच चे…
मंगलमूर्ती फिल्मस् आणि किमया मोशन पिक्चर्स निर्मित या ‘चित्रपटाचा टीझर लाँच सोहळा नुकताच पार पडला. मंगलमूर्ती फिल्मस् च्या संगीता अहिर, क्रिश अहिर आणि किमया मोशन पिक्चर्सचे मोनिष बाबरे या सोहळ्याला उपस्थित होते.
चित्रपटाचे दिग्दर्शक शेखर सरतांडेल आणि पडद्यावर भगवान दादा साकारणारा अभिनेता मंगेश देसाई यांच्याबरोबर चित्रपटाची अभिनेत्री तेजस्वी पाटील यांनीही सोहळ्याला हजेरी लावली. या सोहळ्याला चार चांद लागले ते मराठीतला सुपरस्टार अंकुश चौधरी यांच्या येण्याने…
टीझर लाँचच्या निमित्ताने भगवान दादांचे सुपुत्र अरुण पालव आणि त्यांचे कुटुंबीय यांनी आपल्या उपस्थितीने या सोहळ्याची रंगत वाढवली.
यावेळी संवाद साधताना अरुण पालव म्हणाले, मी या चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकदा माझ्या बाबांचा सहवास अनुभवत असल्याचा भास होत आहे. त्यावेळी बोलताना त्यांनी बऱ्याच आठवणींना उजाळा दिला. भगवान दादा म्हटल्यावर नृत्यकौशल्य हे आलेच…आणि याचीच झलक दाखवण्याची विनंती केल्यावर मंगेश देसाई आणि अरूण पालव यांनी भोली सूरत या गाण्यावर नृत्याविष्कार सादर केला. अरुण पालव यांना नाचताना पाहून भगवान दादाच अवतरले की काय..? असा भास उपस्थितांना झाला.
भगवान दादांचा अलबेला प्रवास दाखवणारा या सिनेमाची कथा आणि पटकथा शेखर सरतांडेल आणि अमोल शेटगे यांनी लिहिली असून शेखर सरतांडेल यांनी याचे दिग्दर्शिन केले आहे.बबन अडागळे यांनी सेट डिझाइन केले असून उदय देवरे यांनी आपल्या कॅमेरात तो काळ बंदिस्त केला आहे. मंगलमूर्ती फिल्मस् प्रस्तुत आणि किमया मोशन पिक्चर्स निर्मित एक अलबेला येत्या 24 जूनला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.