अजित देसवंडीकर यांचे रंगलेखन जहांगीरमध्ये
मुंबईस्थित रंगलेखक अजित देसवंडीकर यांनी अलिकडच्या काळात साकार केलेल्या चित्रांचं ‘सिम्पोझिअम’ हे प्रदर्शन जहांगीर आर्ट गॅलरी, काळा घोडा, मुंबई २४ मेपासून भरणार असून ते ३० मे पर्यंत सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत सर्व कलारसिकांना बघता येईल.
महानगरातील नित्याचं जीवन आणि तिथला निसर्ग याचं यथायोग्य चित्रण अजित देसवंडीकर यांच्या या रंगलेखनात पहायला मिळेल. असीम पसारा असलेल्या महानगरातील पेहराव आणि परिसर यांचं सुक्ष्म चित्रण या माध्यमातून केललं आहे. जीवनातील आंतरीक संघर्ष आणि म:नस्थिती यांचा मागोवा या चित्रांमधून घेतला गेला आहे. एक्रिलिक आणि तैल रंगात कॅनव्हासवर काढलेली ही चित्रं बोलकी आणि प्रवाही झाली आहेत.
मानवी वसाहत, बैलगाडी, शेतकरी, औद्योगिक कार्यस्थान, स्टेशन अशा अनेक ठिकाणची प्रत्ययकारी चित्रं या चित्रकाराने मुर्त रुपाला आणली आहेत.
चित्रकार अजित देसवंडीकर यांची अशी धारणा आहे की ‘दर्शकाच्या मनात घर करून रहाणारीच चित्रं अजरामर होतात आणि चित्रकाराला तिथपर्यंत पोहोचता आलं पाहिजे. चित्रकला ही एक अशी प्रक्रिया आहे ज्यात चित्रकार, कॅनव्हास, दर्शक आणि पाहतानाची म:नस्थिती हे सर्व घटक सारख्याच प्रमाणात महत्वाचे आहेत.’
वरच्या कोनातून दृष्याकडे पाहिल्याचा भास निर्माण करणं हे या चित्रांचं आणखी एक वैशिष्ट्य आहे. ही चित्रं सखोल आणि सामान्याच्या पलिकडे पहण्याची दृष्टी दर्शकाला प्रदान करतात. समकालीन विचारांची एक शृंखला या चित्रांमधून मांडली गेली आहे अशी जाणीव ही मालिका पाहाताना होत रहाते. हे प्रदर्शन पाहताना चित्रांविषयी जवळीक वाटते आणि एक अद्भुत अनुभव प्राप्त होतो.