विधि कासलीवाल आणताहेत नवा सिनेमा
उत्कृष्ट कथानक, मोठ्या कलाकारांची फौज, अनोखा विषय अशा चित्रपटांची प्रेक्षकही आतुरतेने वाट पहात असतात. असाच एक ‘वजनदार’ सिनेमा लॅन्डमार्क फिल्मच्या विधि कासलीवाल घेऊन येत आहेत.
२०१४मध्ये आलेल्या ‘सांगतो ऐका…!’ या चित्रपटातून विधि कासलीवाल यांनी मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केलं. दिग्दर्शक सतीश राजवाडे आणि मराठी–हिंदी विश्वातील गाजलेले नाव सचिन पिळगावकर या दोन दिग्गजांबरोबर त्यांनी ‘सांगतो ऐका…!’ हा चित्रपट केला. याच वाटेवर पुढचे पाऊल टाकत, मराठी–हिंदी सिनेसृष्टीवर आपल्या व्यक्तिमत्त्वाची छाप पाडणाऱ्या सचिन कुंडलकरबरोबर त्या आता यापुढील चित्रपट घेऊन येत आहेत. यानिमित्ताने पहिल्यांदाच लॅन्डमार्क फिल्मच्या विधि आणि सचिन कुंडलकर एकत्र काम करत आहेत.
वेगळ्या विषयांसाठी मराठी चित्रपटसृष्टी प्रसिध्द आहे. याच गोष्टीचे भान ठेवत एक ‘वजनदार’ विषय घेऊन हे दोघे लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. विषय ‘वजनदार’म्हटला की त्याची स्टारकास्टही ‘वजनदार’ असणार यात शंका नाही. असेच मराठी सिनेजगतातले ‘वजनदार’ कलावंत विधि कासलीवाल यांनी ‘वजनदार’ या सिनेमासाठी निवडले आहेत. मात्र ती जाहीर न झाल्याने सिनेरासिकांची उत्सुकता वाढवणारे ठरणार आहे.
आपली निर्मिती प्रेक्षकांसाठी मनोरंजनाबरोबर बोधपूर्णही असावी याच विचारातून विधि कासलीवाल यांनी ‘वजनदार’ या चित्रपटाची निर्मिती केली आहे. “हा चित्रपट प्रेक्षकांचे मनोरंजन करेलच पण प्रेक्षागृहातून बाहेर पडताना एक विचार देऊन जाईल ज्यावर विचार करणे प्रेक्षकांना भाग पाडेल,” अशी आशा विधि कासलीवाल यांनी व्यक्त केली आहे.