भारतीय संस्कृती आणि नृत्य शैलीला समर्प्रित ‘नालंदा डान्स रिसर्च सेंटर’ने नृत्य क्षेत्रात आपली स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. या संस्थेच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यंदाही ‘नालंदा नृत्योत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. येत्या १६ ते १९ जानेवारी दरम्यान रवींद्र नाट्य मंदिराच्या प्रांगणात शास्त्रीय नृत्याचा आस्वाद नृत्यप्रेमीना घेता येणार आहे.
भारतीय शास्त्रीय कला आणि शैलींचे जतन करणारी तसेच आपल्या ऐतहसिक, सांस्कृतिक परंपरांची तरुण पिढीला ओळख करून देणारी आणि भारतीय शास्त्रीय नृत्यशैलींना मान्यता प्राप्त करून देणारी संस्था म्हणजे ‘नालंदा डान्स रिसर्च सेंटर’. १९६६ पासून कार्यरत असणाऱ्या या संस्थेने नवनवीन उपक्रमांतर्गत भारतीय नृत्याचे महत्त्व आणि उपयुक्तता सिद्ध केली आहे. या शिवाय प्राचीन शास्त्रीय ग्रंथ सहाय्याने वेद मंत्रावर आणि भजनावर आधारित ‘पृथ्वी आनांदिनी’ या नवीन उपक्रमाचीही खास झलक उपस्थितांना पाहायला मिळणार आहे.
या नृत्योत्सवात रविवारी १८ जानेवारीला ‘भारतमुनी सम्मान २०१५’ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा ‘भारतमुनी सम्माना’चे हे पाचवे वर्ष असून ‘ नालंदा नृत्योसवा’चे सुवर्णमहोत्सवी वर्ष असा दुग्धशर्करा योग जुळून आला आहे. भारतीय संस्कृती संवर्धनासाठी साहित्य, कला, संगीत क्षेत्रात ज्या दिग्गजांनी अमुल्य योगदान दिले अशा व्यक्तीमत्तवांचा गौरव व्हावा या हेतूने नालंदा नृत्योसवात ‘भारतमुनी सम्मान’ने करण्यात येतो. यावर्षीच्या ”भारतमुनी सम्मान’ २०१५’ पुरस्काराचे मानकरी आहेत – पद्मविभूषण, पद्मभूषण, पद्मश्री, संगीत नाटक अकादमी पुरस्कार, महाराष्ट्र गौरव पुरस्कार, कालिदास सन्मान, संगीत नाटक रत्न पुरस्कार प्राप्त तसेच संगीत मार्तंड सुप्रसिद्ध ज्येठ शास्त्रीय गायक पंडित जसराज. भारतीय रंगभूमीचा ठसा आपल्या लेखनाने जगभर उमटवणारे सरस्वती सन्मान, साहित्य अकादमी, संगीत नाटक अकादमी पुरस्कार विजेते ज्येठ रंगकर्मी महेश ऐलाकुंचवार. मणिपुरी नृत्य विशारद संगीत नाटक अकादमी, कालिदास सन्मान, नृत्य चूडामणी, साहित्य कला परिषद सन्मान आदि पुरस्कारांनी गोरविलेले राजकुमार सिंगजीत सिंग यांना यावर्षी भारत मुनी सन्मान २०१५ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
‘नालंदा डान्स रिसर्च सेंटर’च्या संचालिका डॉ. कनक रेळे यांच्या मार्गदर्शनाखाली या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या नृत्योसवामध्ये देशभरातील विविध प्रांतातील कलाकार भारतनाट्यम, कथ्थक, ओडिसी, मोहोनीअट्टम कुचीपुडी आदि नृत्यशैलीतील आपले नृत्याविष्कार सादर करणार आहेत.