आव्हान स्वीकारून दिग्दर्शित केला ‘बर्नी’
‘प्रा. सुभाष भेंडे यांची ‘जोगीण’ ही कादंबरी काही वर्षांपूर्वी वाचनात आली तेव्हाच यावर चित्रपट बनवण्याचा विचार मनात आला. ‘जोगीण’ मला शांत बसू देत नव्हती. त्यातूनच ‘बर्नी’ या चित्रपटाची निर्मिती केली’ असं मत १७ जूनला प्रदर्शित होणाऱ्या बर्नीच्या दिग्दर्शिका नीलिमा लोणारी यांनी व्यक्त केलं.
राज्य सरकारच्या चित्रपट पुरस्कार सोहळ्यात चर्चेचा विषय ठरत सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार पटकावणाऱ्या ‘चिनु’ या बहुचर्चित चित्रपटानंतर नीलिमा लोणारी ‘बर्नी’ हा आणखी एक स्त्रीप्रधान चित्रपट घेऊन येत आहेत. प्रा. सुभाष भेंडे यांच्या ‘जोगीण’ या कादंबरीवरून प्रेरित होऊन नीलिमा लोणारी यांनी ‘बर्नी’ हा चित्रपट बनवला आहे.

जागतिक पातळीवर चित्रपटसृष्टीत जसा काही महिला दिग्दर्शकांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे, तसाच प्रादेशिक पातळीवरही काही महिला दिग्दर्शकांनी प्रेक्षकांचं मनोरंजन करीत समाजप्रबोधनाचं काम केलं आहे. मराठी चित्रपटसृष्टीतही अशा काही दिग्दर्शिका आहेत ज्या कायम नवनवीन आव्हानांना सामोऱ्या जाण्यासाठी सज्ज असतात. दिग्दर्शिका नीलिमा लोणारी यापैकीच एक आहेत.
‘चिनू’ तसंच ‘गुलदस्ता’ या चित्रपटांच्या यशस्वी निर्मितीनंतर शिवम लोणारी यांनी ‘बर्नी’ची निर्मिती केली आहे. याबाबत बोलताना त्या म्हणाल्या, ‘माझ्या रक्तातच चित्रपट आहे. माझ्या पणजोबांपासूनचं त्याचं बीज रुजलेलं आहे. त्यामुळे माहेरी चित्रपट निर्मिती हा एक जिव्हाळ्याचा विषय होता. माझ्या पणजो मुरलीधर संवत्सरकर यांनी थेट दादासाहेब फाळके यांच्या चित्रपटांसाठी अर्थ सहाय्य केले आहे. दादासाहेबांनी पहिला भारतीय चित्रपट तयार करावा त्यासाठी दादासाहेबांना अर्थसहाय्य करताना ते विनापरतावा बोलीवर देऊन एक कलारसिक नाशिककर असल्याचे दाखून देत. लोककलावंतानाही सढळ हस्ते मदत केली आहे. अश्या प्रकारच्या निर्मितीसाठी पणजोबांनी नफा तोटा पहिला नाही. देशसेवा आणि कलेवरील प्रेम या दोन गोष्टींवर त्यांनी प्रेम केले. त्यामुळे मला बालपणापासून चित्रपट माध्यमाविषयी ओढा आहे आणि बहुतेक तो माझ्या पणजोबांच्या जीन्समधून आला असावा, त्यामुळे या क्षेत्राततील आव्हान लक्षात घेऊन निर्मिती दिग्दर्शनात पाऊल टाकले आहे.’

‘मध्यंतरीच्या काळात काही वेगळे विषय जरी हाताळले असले, तरी ‘जोगीण’ काही मनातून जात नव्हती. अशा प्रकारच्या विषयावर चित्रपट निर्मितीचं च्यालेंज स्वीकारून जोगीणचे रीतसर हक्क घेतले आणि एका वर्षाच्या आत चित्रपट बनवण्याचा निर्धार करून काम सुरू केलं, असंही नीलिमा यांनी सांगितलं.
‘१९७०चा काळ उभारणं हे या चित्रपटात सर्वात मोठं आव्हान होतं. याशिवाय आणखी बऱ्याच आव्हानांचा सामना करावा लागला. ज्या समाजाची आपल्याला माहिती नाही अशा ख्रिस्ती समाजाचा बारकाईने अभ्यास करून त्यावर भाष्य करणारा सिनेमा बनवायचा होता. त्यामुळे ‘बर्नी’साठी ख्रिश्चन धर्माचा अभ्यास सुरू केला. त्यांची संस्कृती, कला, क्रीडा, पोषाख, राहणीमान, भाषाशैली या सर्वांचा खूप खोलवर जाऊन अभ्यास केला. एक महिला दिग्दर्शिका या नात्याने या गोष्टी करणं खूपच आव्हानात्मक होतं, पण तरीही न डगमगता समोर येणाऱ्या आव्हानांचा सामना करीत राहिले. पुढे या चित्रपटाशी इतकी समरस झाले की, चित्रपट कधी पूर्ण झाला ते समजलंच नाही.’

या चित्रपटासाठी सर्वोत्तम टीमची निवड करण्याचंही आव्हान होतं. शीर्षक भूमिकेत तेजस्विनी शिवाय दुसरे कोणी नजरेसमोर येत नव्हत, पण तांत्रिकदृष्ट्याही चित्रपट दर्जेदार बनवायचा असल्याने सिनेमा या तंत्राची उत्तम जाण असलेल्या तंत्रज्ञांची निवड केली. कॅमेरामन समीर आठल्ये यांच्या कॅमेऱ्याची जादू या चित्रपटात प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. त्यांच्यासोबत माझे उत्तम ट्युनिंग आहे. कथेची गरज ओळखून त्यांनी हा चित्रपट ३५ एमएम फिल्मवर शूट केला आहे. या चित्रपटात एकच गाणं आहे, जे श्रीरंग गोडबोले यांनी लिहिलं आहे. या गोवन कल्चर पार्टी साँगमध्ये गोडबोले यांनी गोवन भाषेतील शब्दांचा अचूक वापर केला आहे. संगीतकार अमितराजने यावर अप्रतिम चाल बसवलेली आहेच, पण कोरिओग्राफर उमेश जाधवने त्यावर तितकंच सुरेख नृत्य दिग्दर्शन केलं आहे. गोव्यातील “पात्रा”मधील प्रसिद्ध कलाकारांनी या गाण्यात तेजास्वीनिसोबत परफॉर्म केलं आहे. कॉस्च्युमपासून रंगभूषेपर्यंत सर्वच गोष्टींकडे बारकाईने लक्ष देण्यात आलं आहे. एकूणच टिपीकल गोवन वातावरण या चित्रपटात दाखवण्याचा प्रयत्न ‘बर्नी’च्या टिमने केला आहे.’

१७ जून रोजी प्रदर्शित होणाऱ्या ‘बर्नी’मध्ये तेजस्विनीसोबत नीलकांती पाटेकर, राजन ताम्हाणे, भूषण पाटील, गिरीश परदेशी, सविता मालपेकर, किरण खोजे, सुमुखी पेंडसे, मौसमी तोंडवळकर, चैत्राली डोंगरे, राज हंचनालळे, राधिका देशपांडे आदी कलाकाकारांच्याही भूमिका आहेत.