चित्रीकरणाचा पहिला टप्पा पार
मुलांच्या भावविश्वासोबतच शालेय जीवनाशी निगडीत असलेल्या मुद्यांवर प्रकाश टाकणा-या चित्रपटांच्या पंक्तीत लवकरच आणखी एक मराठी चित्रपट विराजमान होणार आहे. गीतध्वनीमुद्रणाने मुहूर्त झाल्यानंतर लगेचच चित्रीकरणाला सुरूवात झालेल्या ‘कॉपी’ या मराठी चित्रपटाच्या चित्रीकरणाने पहिला टप्पा पार केला आहे.

‘श्री महालक्ष्मी क्रिएशन्स’ची प्रस्तुती असलेल्या निर्माते गणेश पाटील आणि शंकर म्हात्रे यांचा ‘कॉपी’ हा मराठी चित्रपट शिक्षण व्यवस्थेवर भाष्य करणारा असल्याचं शीर्षकावरूनच जाणवतं. हेमंत धबडे आणि दयासागर वानखेडे ही दिग्दर्शकांची जोडी ‘कॉपी’चं दिग्दर्शन करीत आहेत. नुकतंच या चित्रपटाच्या चित्रीकरणाचे पहिले शेडयुल्ड पेण आणि परिसरातील काही लोकेशन्सवर पूर्ण करण्यात आलं.
मिलिंद शिंदे, कमलेश सावंत, अंशुमन विचारे, जगन्नाथ निवंगुणे, विपुल साळुंखे अनिल नगरकर, राहुल बेलापूरकर, आशुतोष वाडकर, पूनम राणे, सौरभ सुतार, प्रवीण कापडे, रवी विरकर, श्रद्धा सावंत, अदनेश मुदशिंगकर, प्रतिक लाड, रोहित सोनावणे, प्रतीक्षा साबळे , शिवाजी पाटणे, सिकंदर मुलानी, आरती पाठक आणि विद्या भागवत या कलाकारांच्या या चित्रपटात भूमिका आहेत.
‘कॉपी’ चित्रपटाविषयी बोलताना दिग्दर्शक म्हणाले, ‘शिक्षणव्यवस्थेवर भाष्य करणारे फार कमी चित्रपट तयार होतात. ‘कॉपी’ हा चित्रपट जरी शिक्षणव्यवस्थेवर भाष्य करणारा असला तरी यात विविध विषय हाताळण्यात आले आहेत. केवळ शिक्षण, विद्यार्थी, पालक आणि शिक्षणसंस्था यांभोवती या चित्रपटाचं कथानक मर्यादित नसून या अनुषंगाने वास्तव जीवनात घडणाऱ्या सत्य घटनांवर भाष्य करणारं आहे. आजच्या शिक्षणव्यवस्थेला आरसा दाखवत त्यातील उणिवांवर प्रहार करणारा आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून ग्रामीण भागात सुरू असलेल्या शिक्षणाच्या बाजारीकरणाचा मुद्दा समोर येणार आहे. शिक्षण घेणा-या किशोरवयीन मुलांच्या मनातील भावनांना वाव निर्माण करून देण्याचं कामही हा चित्रपट करणार आहे. आजच्या बदलत्या शिक्षणव्यवस्थेचा समाजाला जसा फायदा होत आहे, तसा काही प्रमाणात तोटाही होत आहे. समाजात शैक्षणिक क्रांती घडविण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या थोर नेत्यांच्या मनातील भारत आजच्या बाजारीकरणात हरवला आहे, त्याचंच प्रतिबिंब ‘कॉपी’ या चित्रपटात उमटणार आहे. चित्रपटाच्या विषयाला अनुसरून लोकेशन्सची निवड करण्यात आली. सर्व कलाकार आणि तंत्रज्ञाच्या उत्तम सहकार्यामुळे चित्रीकरणाचे पहिले शेडयुल्ड सुरळीतपणे पूर्ण करण्यात आले.’’
दिग्दर्शनासोबतच हेमंत धबडे आणि दयासागर वानखेडे यांनीच राहुल साळवे यांच्यासोबत ‘कॉपी’ची कथा लिहिली आहे. याशिवाय हेमंत आणि दयासागर यांनी या चित्रपटाची पटकथाही लिहिली आहे, तर दयासागर यांनी चित्रपटाचे संवाद लिहिले आहेत. या चित्रपटाची मूळ संकल्पना गणेश रामचंद्र पाटील यांची आहे. संदीप कुचिकोरवे ‘कॉपी’च्या कलादिग्दर्शनाची बाजू सांभाळत असून कॅमेरामन सँटिनिओ टेझिओ छायालेखक आहेत. कोरिओग्राफर रॉकी हारळे यांच्या तालावर चित्रपटातील कलावंत ताल धरणार आहेत. रविंद्र तुकाराम हारळे या चित्रपटाचे कार्यकारी निर्माता असून, जय घोंगे निर्मिती व्यवस्थापक आहेत. राहुल साळवे यांनी या चित्रपटासाठी गीतलेखन केलं असून रोहन-रोहन ही सध्याची लोकप्रिय संगीतकार जोडी या चित्रपटातील गीतांना संगीत देणार आहेत.