‘युवराज’च्या भूमिकेतील अक्षय वाघमारेचा विश्वास
आजच्या तरूण पिढीत बदल घडवण्याची ताकद आहे. फक्त त्यांना योग्य दिशा दाखवण्याची गरज आहे. ही दिशा नुकताच प्रदर्शित झालेला युथ हा चित्रपट त्यांना दाखवेल. या चित्रपटाच्यानिमित्ताने तरूणांना सामाजिकतेचे भान जरूर लाभेल अशी आशा अक्षय वाघमारे याने व्यक्त केली आहे.

विक्टरी फिल्मस् प्रस्तुत आणि सुंदर सेतुरामन निर्मित हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित करण्यात आला आहे. युथ या चित्रपटात युवराज पाटीलची भूमिका अक्षय वाघमारेने साकारली आहे. अत्यंत श्रीमंत घरातला हा मुलगा जो सामाजिक जबाबदाऱ्यांपासून लांब आहे. धमाल, मजा, मस्ती हेच आयुष्य असणाऱ्या या मुलासमोर जेव्हा पाण्याचा गंभीर प्रश्न उभा ठाकतो तेव्हा तो कशाप्रकारे आपल्या यंग ब्रिगेडच्या मदतीने हा गंभीर प्रश्न सोडवतो. हे आपल्याला युथ या चित्रपटातून पाहायला मिळणार आहे. या भूमिकेचा फायदा वैयक्तिक आयुष्यातही झाल्याचे अक्षय म्हणतो.

केवळ सोशल मिडीयावर ऍक्टिव्ह राहून चालणार नाही तर तरूणांनी प्रत्यक्ष पाऊले उचलण्याची गरज असल्याची भावना ही अक्षयने बोलण्यातून व्यक्त केली.
जगात सर्वात जास्त तरूणवर्ग आहे. या तरूणांमध्ये देश बदलण्याची ताकद असून या ताकदीची जाणीव म्हणजे युथ असे अक्षय वाघमारे याने म्हटले आहे. राकेश कुडाळकर दिग्दर्शित या सिनेमात नेहा महाजन आणि अक्षय वाघमारेसह अक्षय म्हात्रे, मीरा जोशी, शशांक जाधव, केतकी नारायण, सतिश पुळेकर आणि विक्रम गोखले यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. विशाल चव्हाण आणि युग लिखित ही कथा तरूणांसाठी अंजन ठरत आहे.