रंगलेखक रमेश पाचपांडे यांचे चित्रप्रदर्शन सुरु
मुंबईस्थित सुप्रसिद्ध रंगलेखक रमेश पाचपांडे यांनी अलिकडच्या काळात साकार केलेल्या चित्रांचं चित्रप्रदर्शन जहांगीर आर्ट गॅलरी मुंबई येथे ३१पासून सुरु झाले असून, ते ६ जून पर्यंत सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत रसिकांना बघता येणार आहे.
रंगलेखक रमेश पाचपांडे यांनी चारकोल, ड्राय पेस्टल्स यांचा वापर करून कागदावर तसंच ऍक्रिलिक रंगांचा वापर करून कॅनव्हासवर साकारकेलेली चित्रं या प्रदर्शनात पाहाता येतील. प्रेम, भक्ती आणि उत्कट भावना यांचा त्रिवेणी संगम या चित्रमालिकेत झालेला दिसतो. प्रेमाची दैवी अनुभूती, सर्व प्राणीमात्रांसाठी आनंदाचा अखंड वाहणारा झरा आणि आध्यात्माची ओढ हा आणखी एक धागा या मालिकेत गुंफला गेला आहे.
या चित्रांमध्ये रंग आणि स्वर यांचा अनोखा संगम पहायला मिळतो. स्त्री पुरूषाच्या काव्यात्मक सहवासाचा गोफ या चित्रांमध्ये गुंफला गेला आहे. जवळजवळ सगळ्याच चित्रांमध्ये केलेल्या वाद्यांचा अंतरभावामुळे श्रीकृष्णाच्या सुंदर स्वरुपाचा आणि छंदाचा भास निर्माण होत रहातो.

रंगलेखक रमेश पाचपांडे यांनी १९७८ साली आपलं कलाशिक्षण मुंबईच्या सर जे.जे. स्कुल ऑफ आर्टमधून पूर्ण केलं आणि त्यानंतर कला क्षेत्राला वाहून घेतलं. त्यानंतर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्थरावर त्यांची अनेक एकल आणि समूह चित्रप्रदर्शनं रसिकांच्या पसंतीस उतरली. जगभरातील प्रतिष्ठित वर्कशॉप्स आणि कॅम्पसमध्ये त्यांचा सहभाग राहिला आहे. बॉम्बे आर्ट सोसायटीसारख्या अनेक संस्थांनी त्यांच्या कलेचा गौरव केला आहे. त्यांच्या का कला कार्किर्दीला त्यांची पत्नी पुष्पलता आणि गुरू गोपाळ सुबेदार यांचा मोलाचा हातभार लागला आहे.