अभिवाचन उपक्रमाचा वर्षपूर्ती सोहळा
चंद्रकांत कुलकर्णी, स्मिता तांबे, जयंत सावरकर आदींचा सहभाग
पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी आणि व्हिजन यांच्या संयुक्त विद्यमाने होणार्या ‘चला, वाचू या’ अभिवाचन उपक्रमाला एक वर्ष पूर्ण झाले असून, या उपक्रमाचे १० वे पुष्प येत्या रविवारी १९ जून रोजी सकाळी १० ते दुपारी १.३० या वेळेत प्रभादेवी येथील रविंद्र नाट्य मंदिरच्या मिनी थिएटरमध्ये साजरे होत आहे.

दर महिन्याला सलग उपक्रम स्वरुपात सुरु झालेला आणि यशस्वी वर्षपूर्ती झालेला अभिवाचनाचा हा मुंबईतील पहिला उपक्रम ठरला आहे.
लोकांमध्ये उत्तम साहित्याची आवड निर्माण होऊन ते लोकांपर्यंत पोहोचावे व एकूण साहित्याबद्दल अभिरुची निर्माण व्हावी, या अनुषंगाने एक सातत्यपूर्ण वाचन चळवळ उभी करण्याच्या उद्देशाने सुरु करण्यात आलेल्या या अभिवाचन उपक्रमामध्ये अभिनेते व कवी किशोर कदम ‘सौमित्र’, संगीतकार कौशल इनामदार, ज्येष्ठ साहित्यिका उषा मेहता, साहित्यिक अनंत भावे, अभिनेते विजय कदम, राजन ताम्हाणे, शैलेश दातार, सुशील इनामदार, शर्वाणी पिल्ले, मानसी कुलकर्णी, प्रसिद्ध कवी व कोकण मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष डॉ. महेश केळुसकर, किरण येले, भक्ती रत्नपारखी, लेखक-दिग्दर्शक कौस्तुभ सावरकर, वृत्तनिवेदिका प्राजक्ता धर्माधिकारी, शुभांगी सावरकर, हेमंत बर्वे, ज्येष्ठ लेखक रवी लाखे, पुणे एसएनडीटी कॉलेजच्या मराठी विभागप्रमुख डॉ. प्रिया जामकर, अभिनेते अभिजीत झुंजारराव, वृत्तनिवेदक विजय कदम आदींसह अनेक मान्यवरांनी यापूर्वीची अभिवाचन सत्रे गुंफली आहेत. साहित्यप्रसाराबरोबरच वाचिक अभिनयाकडेदेखील जाणीवपूर्वक लक्ष वेधण्याचा प्रयत्न करणे हा या उपक्रमाचा हेतू आहे.
गेल्या वर्षभराच्या कालावधीत अनेकांना वाचनाकडे वळवण्यात आणि आवडीने पुस्तक खरेदी करुन ते वाचण्याची आवड निर्माण करण्यात आल्याचे आयोजक सांगतात. प्राथमिक टप्प्यातील निवड प्रक्रियेसाठी जाहीर आवाहनाद्वारे ऑडीओ-व्हिडीओ क्लिप्स मागवण्यात आल्यानंतर साहित्य वाचनाची आवड असलेल्या अनेक नवोदित वाचक कलावंतांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आणि शंभरहून अधिक क्लिप्स आल्या. त्यातून निवड झालेल्या कलावंतांनादेखील या उपक्रमात अभिवाचन करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करुन देण्यात आले आहे.
या निमित्ताने वाचन चळवळ वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने अभिवाचनाचे एक कायमस्वरुपी व्यासपीठ निर्माण करण्याचा प्रयत्न असून त्यासाठी रसिकांना विनामूल्य प्रवेश आहे. या अभिवाचन कार्यक्रमास रसिकांनी बहुसंख्येने उपस्थित राहून उपक्रमाचा प्रसार व वृद्धी करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन अकादमीचे प्रकल्प संचालक आशुतोष घोरपडे व व्हिजनचे संचालक श्रीनिवास नार्वेकर यांनी केले आहे.