ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांचा विश्वास
शाळेत जाणाऱ्या एका विद्यार्थ्याला हवा असणारा शाळेचा गणवेश, तो मिळविण्यासाठी त्याचा संघर्ष आणि त्याचसोबत पोलिस, मंत्री यांचीही वेगळ्या गणवेशांसाठीची धडपड असे अनेक पैलू नव्या ‘गणवेश’ सिनेमात बघायला मिळणार आहेत. या सिनेमानिमित्त ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांच्याशी मारलेल्या गप्पा…

मला या सिनेमाची कथा खूप आवडली. एका हुशार, गुणी विद्यार्थ्याची गणवेश मिळविण्यासाठीची धडपड या सिनेमात फार प्रभावीपणे मांडण्यात आली आहे. ही कथा आपल्या स्वातंत्र्यदिनाभोवती इतक्या छान पद्धतीने गुंफली आहे की त्यातून मनोरंजन तर होतंच, शिवाय सामाजिक प्रबोधनसुद्धा होतं.
‘गणवेश’ सिनेमाचं वेगळेपण काय सांगाल?
गणवेश’ या एका शब्दाभोवती सिनेमाची कथा असली तरी या गणवेशाचे अनेक अर्थ सिनेमामध्ये आहेत. सिनेमाची मुख्य कथा एका छोट्या मुलाभोवती फिरते. त्याची शाळेचा गणवेश मिळविण्याची धडपड हा सिनेमाचा मुख्य गाभा आहे. या मुख्य कथेसोबतच मुक्ता बर्वेचा पोलिसाचा गणवेश, माझा मंत्र्याचा खादीचा गणवेश सांभाळण्याची धडपडही या सिनेमात दाखवली आहे.

मी खूप वेळा मंत्र्याची भूमिका साकारली आहे हे खरंय. पण अनेकदा थोडी निगेटिव्ह शेड असलेला तो मंत्री असायचा. मी आजवर तीनवेळा मुख्यमंत्री झालोय, एकदा सांस्कृतिक मंत्रीही झालोय. पण ‘गणवेश’ मध्ये मी शिक्षणमंत्री साकारलाय. गावावर, गावकऱ्यांवर प्रेम करणारा, नैतिक मुल्य जपणारा एक प्रामाणिक मंत्री अशी माझी व्यक्तिरेखा आहे. सिनेमाच्या मुख्य कथेसोबत माझी खादीच्या गणवेशाची एक वेगळी कथाही यात उलगडेल.
अतुल जगदाळे या नव्या दिग्दर्शकासोबत काम करण्याचा अनुभव कसा होता?
मी आतापर्यंत अनेक नव्या दिगदर्शकांसोबत काम केलंय. अनेक वर्ष ही इंडूस्ट्री मी जवळून बघितली आहे. त्यामुळे दिवसेंदिवस यात होणारे बदल स्वागतार्ह आहेत. मराठी दिग्दर्शक नवं काहीतरी मांडू पाहताय. वेगळ्या पद्धतीने विचार करू पाहतायत. ही खरच कौतुकाची गोष्ट आहे. अतुल जगदाळेसोबतचा माझा अनुभवही असाच काहीसा होता, उत्त्तम व्हिजन असलेला दिग्दर्शक असला की सिनेमाही उत्तम बनतो यात शंका नाही.
मराठी सिनेमात ‘गणवेश’च योगदान काय असेल?
मला असं वाटत,की हा एक वेगळा प्रयत्न असेल. स्वप्न बाळगणाऱ्या एका छोट्या मुलाचा संघर्ष फार साध्या पद्धतीने मांडण्याचा यात प्रयत्न झाला आहे. तो तितकाच परिणामकारकरित्या पोहचेल अशी आमची अपेक्षा आहे.