संतोष पवारचं नवं कोरं नाटक
‘लग्नलॉंजी’, ‘स्पिरीट’, ‘अबीर गुलाल’ या यशस्वी नाटकानंतर निर्माते अशोक दगडू शिगवण तृप्ती प्रॉडक्शनच्या बॅनरखाली ‘आलाय मोठा शहाणा’ हे धमाल विनोदी नाटक घेऊन आले आहेत. संतोष पवार दिग्दर्शित या नाटकाचे लेखन वैभव अर्जुन परब यांनी केले आहे.
संतोष पवारांचं नाटक म्हणजे धमाल मनोरंजन असणार हे ओघाने आलंच. आतापर्यंत ४० हून अधिक नाटकं सादर केलेला व गेली अनेक वर्ष नाट्य व चित्रपटसृष्टीत उत्कृष्ट लेखन, दिग्दर्शन व अभिनयाच्या जोरावर घराघरात पोहोचलेला संतोष पवार यांचं ‘आलाय मोठा शहाणा’ हे नाटक म्हणजे विनोदाचा खजिना आहे.
या नाटकात ‘मुलगी शिकली प्रगती झाली’ हा आजचा ध्येयमंत्र अधोरेखित केला आहे. यातील नायिका ९ वीपर्यंत शिकली आहे पण दहावी पास होणं तीच्या आवाक्याबाहेर आहे. त्यामुळे तीचं लग्न होत नाही. लग्नासाठी तीला दहावी पास होणं गरजेचं आहे. त्यासाठी तीला खासगी शिकवणी ठेवली जाते व त्यातून जी धम्माल मस्ती उडते त्याचं रंजक सादरीकरण या नाटकात दिग्दर्शक संतोष पवार यांनी आपल्या स्टाइलने केले आहे.
नाटकाची कथा अतिशय धम्माल विनोदी गमतीशीर आहे. त्यामुळे सर्वच वयोगटातील प्रेक्षकांचं हे नाटक उत्तम मनोरंजन करील असा निर्माते – दिग्दर्शकांना विश्वास आहे. ‘कॉमेडी एक्सप्रेस’ विनोदी मालिका तसेच ‘खळखट्याक’, ‘एका लग्नानंतरचे घोस्ट’ ‘सतराशे साठ सासूबाई’ या नाटकातून व अनेक चित्रपटातील उत्कृष्ट अभिनयासाठी ओळखला जाणारा प्रतिभावंत अष्टपैलू अभिनेता आशिष पवार या नाटकात मास्तराच्या भूमिकेत आहे.
‘जाणून बुजून’ या नाटकानंतर संतोष पवार व आशिष पवार हे जवळ जवळ १३ वर्षानी एकत्र येत आहेत. त्याचबरोबर विनोदवीर आनंदा कारेकर, महेश कोकाटे, नितीन जाधव, ओमकार पनवेलकर, मनीषा चव्हाण, विनोद दाभिळकर हे लोकप्रिय कलाकार या नाटकात इतर भूमिकेत आहेत. ‘आराधना’, ‘आभास हा’, ‘तू जीवाला गुंतवावे’ या मालिकेतील व ‘भाकरखडी’ चित्रपटातील लोकप्रिय अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर देशपांडे ही या नाटकात काम करीत असून या नाटकाद्वारे ती रंगभूमीवर पदार्पण करीत आहे. नाटकाचे संगीत अमीर हडकर यांचे असून नेपथ्य संदेश बेंद्रे, प्रकाशयोजना शीतल तळपदे, नृत्य संपदा जोगळेकर, गीते राजेश देशपांडे यांची असून सुत्रधार गोट्या सावंत हे आहेत.
चांगली संहिता, उत्तम अभिनेते, नेत्रसुखद नेपथ्य, संगीत आणि दिग्दर्शन या सर्व बाजूंनी परिपूर्ण असं हे नवीन धम्माल विनोदी नाटक ‘आलाय मोठा शहाणा’ प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यास येत आहे.