‘मरणात खरोखर जग जगते’ आज मुंबईत
वेगवेगळ्या विषयांवर रंगमंचीय आविष्कार करण्यासाठी प्रसिद्ध असलेले कलावंत २४ जूनला ‘मरणात खरोखरच जग असते’ या महत्वाच्या नाटकाचा प्रयोग सादर करत आहेत. विलेपार्ले पूर्वतील साठे सभागृहात या नाटकाचा प्रयोग सांयकाळी ७.३० वाजता सादर होत आहे. या नाटकात स्त्री मनाच्या आंदोलनाचा वेध घेण्यात आला असून, हा देखणा आविष्कार रसिकांना तेवढ्याच तीव्रतेने अस्वस्थही करणार आहे.
मिलिंद फाटक आणि रसिका आगाशे लिखित या नाटकाचे दिग्दर्शनही रसिका आगाशेने केले आहे. तिच्यासह किरण खोजे, अंगद म्हसकर, गिरीश परदेशी यात महत्वाच्या भूमिका साकारत असून, सोबत नृत्यांगनांचा समूह आहे.

स्त्रीला देवीही म्हणायचं आणि प्रसंगी तिची खेटरानं पूजा करायची, हा पुरुषप्रधान संस्कृतीचा जो एक सोयिस्करपणा आहे, त्याच्याकडे एक कलावंत, त्याची एक मॉडेल, एक शिकारी आणि एक सामान्य स्त्री यांच्या नजरेतून बघण्याचा हा एक प्रयत्न आहे.
हेंरिक इब्सेन लिखित ‘व्हेन वी डेड अवेकन’ या नाटकाचे हे एक मुक्त रूपांतर.
एक शिल्पकार एका मॉडेलला त्याच्या एका मास्टरपीससाठी वापरतो आणि नंतर एका सामान्य स्त्रीशी लग्न करतो. यात तो त्या दोघींनाही फसवतो, एका अर्थीं त्या सामान्य स्त्रीच्या आयुष्यात जेव्हा एक शिकारी येतो. तिला तिच्या मुक्ततेचं स्वप्न दाखवतो. ती धावू लागते; पण काही काळानी तिचा भ्रमनिरास होतो. तिकडे ती मॉडेल तर एक शिल्प बनून कधीच मृत बनून राहिली आहे आणि तिचं स्वत्व शोधत एका कविकल्पनेची सावली बनून राहिली आहे.

एकीकडे स्त्रीला प्रेरणा म्हणायचं आणि दुसरीकडे त्याच प्रेरणेला देवीच्या रुपात गाभा-यात बंदी बनवून तिचं स्वातंत्र्य नष्ट करायचा हा खेळ आजतागायत चालूच आहे, कसा संपणार हा खेळ? असा प्रश्न हा रंगमंचीय आविष्कार रसिकांच्या मनात उपस्थित करतो.