‘मरणात खरोखर जग जगते’वर श्वेता पेंडसे यांचे भाष्य

श्वेता पेंडसे
तब्बल दीडशे वर्षाहून अधिक परंपरा असलेल्या मराठी रंगभूमीवर काही वर्षात अनेक नवनवीन आविष्कार झाले. प्रायोगिक आणि व्यावसायिक रंगभूमी अधिकाधिक समृद्ध होऊ लागली. उत्तमोत्तम संहिता आणि दर्जेदार सादरीकरण यामुळे मराठी रंगभूमीकडून आता अपेक्षा वाढतच चालल्या आहेत. एकीकडे जिथे व्यावसायिक पातळीवर नाटकाने निव्वळ चांगला ‘धंदा’ करावा या कारणासाठी दर्जाहीन विनोदांनी लदबदलेल्या टुकार संहिताना खुलवण्याचा प्रयत्न केला जातोय, तिथेच दुसरीकडे प्रायोगिक रंगभूमीवर काही नाटके अत्यंत मेहनतीने रंगभूमीची परंपरा टिकवण्याचा प्रयत्न करताहेत. रसिका आगाशे आणि मिलिंद फाटक लिखित ‘मरणात खरोखर जग जगते’ हे नाटक त्यातीलच एक!

हेन्रिक इब्सन हा नाटककार मुळातच वास्तववादी आणि स्त्रीप्रधान लिखाणासाठी प्रसिद्ध आहे आणि ‘व्हेन वी डेड अवेकन’ ही त्याची शेवटची कलाकृतीही याला अपवाद नाही. इब्सनने हे नाटक तो स्वतः मरणाच्या दारात असताना लिहिले. आयुष्याच्या शेवटावर स्वतःचा जीवनपटच त्याने या नाटकात मांडला असेही जाणकारांचे मत आहे.

१८९० च्या काळात इब्सनचे लेखन वास्तववादापासून लांब जात अधिकाधिक प्रतिकात्मक होत गेले आणि त्याबरोबरच त्याचे सादरीकरण अवघड होत गेले. ‘व्हेन वी डेड अवेकन’ हे नाटक जेवढे वास्तवाच्या जवळ जाते तितकेच ते प्रतिकात्मकही आहे. अशा नाट्यकृतीचे तितकेच परिणामकारक रुपांतर हे तर अत्यंत आव्हानात्मक. मात्र मिलिंद फाटक आणि रसिका आगाशे यांनी हे शिवधनुष्य लीलया पेलले आहे आणि तेवढ्याच ताकदीचे ठरलेय रसिका आगाशेचे दिग्दर्शन.
आरव हा जगप्रसिद्ध मूर्तिकार. त्याने स्वतःला त्याच्या कलेसाठी वाहून घेतलंय. इरा ही त्याची पहिली बायको आणि त्याच्या शिल्पामागची प्रेरणाही. इरामुळेच आरव ‘आदिमाया’ हे शिल्प घडवू शकला ज्याला जागतिक पातळीवर मान्यता मिळाली. मात्र इरा नेहमीच त्याच्यासाठी केवळ एक मॉडेलच राहिली, केवळ एक प्रेरणा! खरे प्रेम, सांसारिक सुख तो तिला कधीच देऊ शकला नाही. ‘आदिमाया’ हे शिल्प म्हणजेच त्यांचे मूल, असे मानून, इराचा सृजनाचा अधिकारही त्याने हिरावून घेतला. हे दुःख सहन न होऊन ती त्याच्या आयुष्यातून निघून गेली. तिचे अस्तित्वच अर्थहीन झाल्याने ढोबळ अर्थाने मृत झाली. इरा गेल्यानंतर आरव एकही सुरेख शिल्प घडवू शकला नाही. उलट दोन निराळी तोंडे असलेल्या हिंस्त्र श्वापदांच्या प्रतिमा त्याच्या हातून घडू लागल्या. आपला पुरुषी अहंकार सुखावण्यासाठी त्याने मायाला त्याच्या आयुष्यात आणले. मायाचीही फसवणूकच झाली. संसारसुख तिला कधीच मिळाले नाही. शिवाय, आरवलासुद्धा इरासारखी प्रेरणा मायाकडून कधीच मिळाली नाही. माया त्याला कुठल्याच बाबतीत त्याच्या तोडीची वाटली नाही. त्याच्या कलेला समजून घेण्याची क्षमताच तिच्यात नाही, हीच त्याची धारणा. परंतु असे असूनही मायाचा त्याग करायची त्याची तयारी नाही. त्याच्या कोरड्या जगात, रुक्ष नात्यात तिचे बंदिस्त असणेच त्याला हवे आहे. अशा विचित्र व्यूहात अडकलेल्या मायाला आशेचा किरण दिसतो तो संग्रामच्या रुपात.

इकडे माया संग्रामसोबत सुखाच्या शोधात पर्वतशिखराच्या दिशेने निघते. मात्र तिथेही तिच्या पदरी निराशाच पडते. प्रदीर्घ चर्चेनंतर इरा आणि आरवदेखील त्याच वाटेने निघतात आणि आयुष्याच्या एका वेगळ्या भावनिक आणि वैचारिक पातळीवर या चारही पात्रांची पुन्हा भेट होते. माया आणि इरा सुरुवातीला अत्यंत भिन्न वाटणाऱ्या स्त्रियांचे आयुष्य आता एकाच टप्प्यावर येऊन ठेपते आणि अखेर त्यांना मुक्तीचा मार्ग दाखवणाऱ्या दाराची किल्ली सापडते.
मूळ संहितेच्या शेवटाला बदलण्याचे स्वातंत्र्य इथे लेखकांनी घेतले आहे. अत्यंत क्लिष्ट असणाऱ्या संहितेला खूप नाविन्यपूर्ण पद्धतीने मांडण्यात रसिकाने आपले दिग्दर्शनाचे कसब पणाला लावले आहे. इतका गंभीर विषय सहज करून लोकांपुढे मांडणे म्हणजे गंमत नाही; पण रसिकाला यात पूर्ण यश मिळाले आहे. हे नाटक बघताना तिचा अभ्यास आणि अनुभव दोहोंची कल्पना येतेच.
शीर्षकात उल्लेख झालेले ‘मरण’ हे इतर कोणाचे नसून आरव, इरा आणि माया यांचे आहे. कोणत्याही प्रकारचे बंधन, कैद हे मरणासारखेच असते असे मानले, तर ही तिन्ही पात्रे इब्सनच्या दृष्टीने मृतच आहेत. हे बंधन दिग्दर्शिकेने नाटकाच्या प्रत्येक टप्प्यात उत्तम दाखविले आहे. सतत अपयश आणि नैराश्येच्या काळ्या गडद सावल्यांनी ग्रासलेली आणि म्हणून स्वतःचा प्रकाशस्रोत स्वतः घेऊन चालणारी, मुक्त भासणारी इरा आरवला भेटल्यावर पुन्हा वेगळ्या बंधनात बंदिस्त होते. तसेच सुरुवातीपासून साखळदंडात अडकलेली माया शेवटपर्यंत त्यातून बाहेर येतच नाही. बदलत जातो तो फक्त कैदेचा प्रकार आणि कुलूप.
मायाची घुसमट दाखवण्यासाठी केलेला भातुकलीचा वापर, शिल्पांच्या मदतीने तयार केलेले रिंगण, दुधीभोपळा आणि उखाळाचा वापर या साऱ्या गोष्टी इब्सनच्या मूळ संहितेत असलेल्या ‘सिम्बॉलीझम’ला न्याय देतात.
आरवचे सलादसोबत बाहुलीला चिरणे तर लाजवाब! पाषाणासारख्या अचल, अचेतन आणि रुक्ष वास्तूशी निगडीत असलेल्या शिल्पकाराच्या आयुष्यातील अस्थैर्य, घालमेल, इतरांना कधीही न जाणवणारे पण त्याला सतत जाणवणारे त्याच्या शिल्पांमधील चैतन्य, त्याचा त्यांच्याशी होणारा संवाद, हे सगळे रसिकाने अप्रतिम दाखविले आहे. यासाठी आणि इतर अनेक गोष्टींसाठी तिने केलेला चार नृत्यांगनांचा वापर तर अत्यंत प्रशंसनीय आहे!
सनातन चक्रवर्ती यांनी केलेल्या पूरक आणि नेटक्या नृत्यादिग्दर्शनाचाही यात मोलाचा वाटा आहे. दिग्दर्शनाइतकीच नाटकाची अभिनयाची बाजूही भक्कम आहे. सर्वच कलाकारांनी जीव ओतून काम केले आहे. गिरीश परदेशी यांनी आत्मकेंद्री, अहंकारी शिल्पकार आरव तंतोतंत उभा केला आहे. देह्बोलीपासून संवादांपर्यंत त्या पात्राचा त्यांनी केलेला अभ्यास पदोपदी जाणवतो.

अंगद म्हसकर संग्रामच्या भूमिकेत शोभून दिसला आहे. लेखकाने दिलेल्या भाषेच्या वेगळ्या लहज्यामुळे त्याचे पात्र आणखीच उठावदार होते. सगळ्या बंदिस्त पात्रांमध्ये हा एकमेव स्वच्छंद आणि रांगडा शिकारी अंगदने छान साकारला आहे. रसिकानेही इराला न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. मात्र या नाटकात तिच्या अभिनयापुढे तिच्या दिग्दर्शनाचेच पारडे वजनदार आहे. चिन्मयी, नेहा, लक्ष्मी आणि ज्योती या चारही नृत्यांगनांचे कौतुक करावे तेवढे थोडेच!
महिषासुरमर्दिनी ते हिंस्त्र श्वापदे, प्रसंगी निर्जीव शिल्पे आणि गडद सावल्या, सगळेच या चौघींनी उत्कृष्ट साकारले आहे. शिकारीचा प्रसंग तर भन्नाट! नृत्याचा आणि देहबोलीचा एवढा सुरेख वापर क्वचितच बघायला मिळावा.
संवादापलीकडे नाटकात जे काही आहे ते सगळे मांडण्याचे काम या चौघी करतात. थोडक्यात त्यांच्याविना नाटक अपूर्ण आहे.


नाटक सुरु झाल्यावर पुढील एक तास दहा मिनिटे प्रेक्षकांना एका वेगळ्या भावविश्वात खेचून नेण्यात दिग्दर्शक आणि कलाकार यशस्वी होतात. लेखनाची ओघवती शैली क्लिष्ट संवादांनाही खूप सोपं करून टाकते, ज्याचा उपयोग कलाकारानाही होतो आणि प्रेक्षकांनाही. अंतर्ध्वनी प्रॉडक्शन्स आणि नॉर्वेजिअन एम्बसी यांनी एक उत्कृष्ट कलाकृती रसिकांसाठी आणली आहे ह्यात वाद नाही. इतक्या उत्तम नाटकांना केवळ थोडासा पाऊस आला म्हणून प्रेक्षकांची अत्यल्प उपस्थिती असणे ही अत्यंत खेदाची बाब आहे. एक प्रयोग उभा करण्यामागे खूप मेहनत असते. विशेषकरून भक्कम आर्थिक पाठिंबा नसलेल्या प्रायोगिक रंगभूमीवर सगळ्यांनी जीव ओतल्यावर एक उत्तम कलाकृती आकार घेत असते. प्रेक्षकांच्या अनुपस्थितीने कलाकारांचा हिरमोड तर होतोच पण त्याच वेळी रसिकही एका सुरेख अनुभूतीला मुकतात, हे विसरून चालणार नाही.
‘मरणात खरोखर जग जगते’च्या पदरी मात्र भक्कम यश पडणार हे निश्चित. संपूर्ण चमूला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!
-श्वेता पेंडसे