पोस्टरने चाळवली प्रेक्षकांची उत्सुकता
इरॉस इंटरनॅशनलच्या क्रीशिका लुल्ला आणि रवी जाधव या दोघांची निर्मिती असलेला ‘& जरा हटके’ सिनेमा प्रेक्षकांची उत्सुकता वाढवत आहे. प्रकाश कुंटे दिग्दर्शित या सिनेमाच्या पोस्टरवरील ‘&’ या इंग्रजी मुळाक्षराच्या ग्राफिटींना सोशल नेटवर्किंग साईटवर पसंती मिळत आहे. नात्यांमधले बदलते स्वरूप दाखवणारा हा सिनेमा २२ जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

प्रेम करावे पण जरा हटके या उपशीर्षकातून बरेच काही सांगू इच्छिणारा हा ‘&’ सोशल साईटवर लोकांचे हटके मनोरंजन करताना दिसत आहे. मिताली जोशी लिखित या सिनेमात आपल्याला मराठी आणि बंगाली संस्कृतीचा संगम अनुभवता येणार आहे. एका मध्यमवयीन स्त्री-पुरूषाच्या सुंदर नात्याभोवती सिनेमाची कथा गुंफण्यात आली.

‘&’ हे मुळाक्षरचं मुळात दोन भिन्न गोष्टींना जोडणारं असून नात्यांना पूर्णत्व देणार असल्यामुळे चित्रपटातील या मुळाक्षराला अधिक महत्व देण्यात आलंय. बंगाली अभिनेता इंद्रनील सेनगुप्ता या सिनेमातून मराठीत पदार्पण करीत आहे. इंद्रनीलसोबतच मृणाल कुलकर्णी, सिद्धार्थ मेनन, शिवानी रांगोळे हे कलाकारही आपल्याला या सिनेमात पाहता येणार आहेत.