कोकणी भाषेतील पहिला बालचित्रपट
‘आ वै जा सा ‘ हा कोकणी भाषेतील पहिला बालचित्रपट येत्या जुलै महिन्या मध्ये चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. हा चित्रपट निश्चितपणे वेगळ्या पठडीतील चित्रपट ठरणार आहे. लहान मुलांसह साऱ्यांनाच बरेच काही या चित्रपटातून मिळणार आहे.

या चित्रपटात महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक आणि केरळ येथील कलावंत आहेत. या चित्रपटातील संवाद अर्थातच कोकणी भाषेतील असतील. कुमारी गौरीका राव या नवोदित बालअभिनेत्रीने छोटी पण अतिशय महत्वाची भूमिका या चित्रपटात केली आहे. हा चित्रपट धमाल आणि मनोरंजन याने परिपूर्ण आहे. मुलांना सशक्त आणि सक्षम बनवणे, त्यांच्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावणे, त्यांना या देशाचे परिपूर्ण, आत्मविश्वासू आणि प्रामाणिक नागरिक बनवणे यासाठी हा चित्रपट खूप महत्वाचा ठरणार आहे.
पारंपरिक गिंडी नृत्य, यक्षगान, पपेट्री अशा सांस्कृतिक कलांना या चित्रपटात उत्तमपणे चित्रित केले गेले आहे. बाल कलावंतामध्ये सार्थक शेणॉय, श्रेयस कामत, समर्थ शेणॉय आणि स्पंदना पै यांचा समावेश आहे. हा चित्रपट सुप्रसिद्ध कोकणी चित्रपट दिग्दर्शक डॉकटर के. रमेश कामत यांनी दिगदर्शित केला आहे.
चित्रपटाचे चित्रीकरण कर्नाटकच्या सुंदर किनारपट्टीवर करण्यात आले आहे.
२ जुलै २०१६ रोजी या चित्रपटाचा वर्ल्ड प्रीमिअर ‘नाका ‘ यांनी आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय कोकणी परिषद २०१६ मध्ये सम्पन्न होत आहे. हा सोहळा अटलॅण्टा, जॉर्जिया, अमेरिका येथे होत आहे.
डॉकटर रमेश कामत हे मूळचे बंगलोर येथील असून ते पुणे येथील प्रसिद्ध एफ टी आय संस्थेचे पदवीधर आहेत. १९८० साली त्यांनी पहिल्या सारस्वत कोकणी चित्रपटाचे दिगदर्शन आणि निर्मिती केली होती. चित्रपटाचे नाव होते ‘जन मान’. बंगलोर येथील जवाहरलाल नेहरू प्ल्यानेटोरियमचे ते माजी संचालक होते. त्यांनी अनेक कोकणी पुस्तकांचे लेखन केले असून, ‘भारत पुराचो भारत मस्तर ‘ हे त्यांचे पुस्तक खूप लोकप्रिय झाले होते. हे पुस्तक केरळ कोकणी अकादमीने प्रकाशित केले होते .