‘मेड इन महाराष्ट्र’ १ जुलैला सिनेमागृहांत
बिघडलेल्या मुलांना ‘शिक्षा’सोबत सुधारण्याची ‘दीक्षा’ देणारा ‘मेड इन महाराष्ट्र’ हा सिनेमा १ जुलै रोजी प्रदर्शित होत आहे. या सिनेमात संपूर्ण महाराष्ट्राला आपल्या विनोदी अभिनयाने खळखळून हसवणारे भाऊ कदम यांची मध्यवर्ती भूमिका असून, या भूमिकेतून ते कुणाकुणाची ‘हवा’ गूल करतात याची उत्सुकता मराठी सिनेरसिकांना लागली आहे.
मुंबईतील प्रेस क्लबमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत या चित्रपटाविषयीची माहिती देण्यात आली. या वेळी दिग्दर्शक नितेश पवार, निर्माते रणजित यादव – रमेश तापकीर यांच्यासह अरुण नलावडे, जितु गोस्वामी, प्रिया गमरे, प्रवीण गर्जे व शीतल गायकवाड आदी कलाकार उपस्थित होते.
श्रीमंत बापाची बिघडलेली मुले ड्रग्जच्या आहारी जाऊन वाया जातात. त्यांना सुधारण्यासाठी ‘मेड इन महाराष्ट्र’ नावाच्या सुधारगृहात पाठविले जाते. या सुधारगृहातील शिस्त आणि इतर गमती जमती म्हणजेच ‘मेड इन महाराष्ट्र’ होय, अशी चित्रपटाची थोडक्यात कथा दिग्दर्शक नितेश पवार यांनी मांडली.
‘मेड इन महाराष्ट्र’ आताच्या पिढीवर भाष्य करणारा चित्रपट असून नवीन पिढीला दोष न देता त्यांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करुन दिली असता ते किती चांगले कार्य करु शकतात. याचे सुंदर चित्रण म्हणजे मेड इन महाराष्ट्र होय. मी यामध्ये एका पोलीस कमिशनरची भूमिका साकारत आहे, मी याआधी पण पोलिसाची भूमिका केली आहे पण त्या भूमिका मर्यादित होत्या, अशा प्रकारची भूमिका करण्याची माझी इच्छा होती ती ‘मेड इन महाराष्ट्र’मुळे पूर्ण झाली, असे अरुण नलावडे यांनी सांगितले.
‘मेड इन महाराष्ट्र’ या सिनेमात एकूण ५ गाणी असून, नेहा राजपाल, स्वप्नील बांदोडकर, बेला शेंडे, हृषीकेश रानडे, अभिजित कोसंबी आणि वैशाली माडे या लोकप्रिय गायकांच्या आवाजात अरुण-विलास आणि सचिन-सुभाष यांनी स्वरबद्ध केली आहेत. ‘मेड इन महाराष्ट्र’ या सिनेमाची कथा, पटकथा आणि दिग्दर्शन नितेश पवार यांचे आहे. सिनेमाची निर्मिती श्रीसिद्धिविनायक प्रसन्न क्रिएशनचे रणजीत यादव यांची असून रमेश तापकिर हे सहनिर्माते आहेत.
गरमागरम संवाद, सुमधुर संगीत, खिळवून ठेवणारा विनोद यांनी सज्ज झालेला हा सिनेमा येत्या १ जुलै २०१६ रोजी संपूर्ण महराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.