‘डिस्को सन्या’ चित्रपटाचे ट्रेलर लॉंच
‘सैराट’मधील झिंगाटने मराठी सिनेरसिकांना वेड लावल्यानंतर आता ‘डिस्को सन्या’ या चित्रपटातील ‘जय चिंगाबुंगाचा’ माहोल सुरू झाला आहे. ‘नाचीज को सन्या कहते है… डिस्को सन्या’, अशी तुफान डायलॉगबाजी करणारा ‘डिस्को सन्या’ हा चित्रपट ५ ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. नुकतंच मुंबई स्थित फेमस स्टुडिओमध्ये या बहुचर्चित चित्रपटाचे ट्रेलर आणि सॉंग लॉंच करण्यात आले.
‘डिस्को सन्या’ या आपल्या पहिल्याच मराठी चित्रपटाद्वारे निर्माते, संगीतकार आणि लेखक सचिन पुरोहित- अभिजीत कवठाळकर हे एंटरटेन्मेंटचे कम्प्लिट पॅकेज असलेला, एकसे बढकर एक कम्पोझिशन, दर्जेदार अन् तरुणाईला वेड लावेल अशी गाणी घेऊन अवतरले आहेत.

बॉलिवूडचे ‘महानायक’ अमिताभ बच्चन यांच्यासोबत ‘भूतनाथ रिटर्न्स’ सिनेमात रूपेरी पडदा गाजवून राष्ट्रीय पुरस्कारांवर आपले नाव कोरलेला महाराष्ट्राचा लाडका ‘वंडर किड’ पार्थ भालेराव ‘डिस्को सन्या’ या मराठी सिनेमातून पहिल्यांदाच लीड रोलमध्ये दिसणार आहे.

चित्रपटातील सर्व गाणी ही दिग्दर्शक नियाज मुजावर यांच्या शब्दात सजलेली आहेत. यातील ‘चिंगाबुंगा’ या गाण्यातून आदर्श शिंदे व रिषभ पुरोहित हे सर्व प्रेक्षकांना आपल्या तालावर थिरकविणार, यात काही शंका नाही. पूर्वी चित्रपटातील गाणे हुबेहुब वाटावे यासाठी जसे दिलीप कुमारसाठी रफी, राजेश खन्नासाठी किशोरकुमार, मिथुन चक्रावरतीसाठी विजय बेनेडिक्ट ई. समीकरणे ठरलेली असायची त्याचप्रमाणे इथेही गायक रिषभ पुरोहीत यांचा आवाज बालकलाकार पार्थ भालेराव याच्या आवाजाशी मिळताजुळता असल्यामुळे गाण्यात पार्थ स्वतः गात असल्याचा भास होतो व याचा आनंद प्रेक्षकवर्ग नक्कीच घेतील.
प्रत्येकालाच ठेका धरायला लावणारे चित्रपटाचे प्रमोशनल सॉंग ‘आला बघा डिस्को सन्या’ हे फुल ऑन गाणं अवधूत गुप्ते यांनी गायले आहे.
चित्रपटातील संगीताच्या बाजाबद्दल आपल्या कल्पना नेमक्या काय होत्या, हे सांगताना अभिजीत कवठाळकर म्हणाले की, ‘सध्या पारंपारिक संगीतातून निर्माण केलेल्या नव्या संगीत रचनांना चित्रपट रसिकांकडून तितकी जास्त पसंती मिळत नाही. म्हणूनच कथा पुढे घेऊन जाणारी गाणी निर्माण करून प्रेक्षकांना गुंतवून ठेवण्यासाठी व त्यायोगे मनोंरजन व्हावे यासाठी गाण्यांचे बीट्स, चाली, शब्दांमध्ये नव्या रचना आणि प्रयोग करून एक आगळीवेगळी ट्रीटमेन्ट देण्याचा प्रयत्न आम्ही या चित्रपटातून केला आहे. सरतेशेवटी आम्हाला जे आवडलं ते करण्यात आम्ही यशस्वी झालो, असे मला वाटते. मात्र आता प्रेक्षकांना किती आवडेल हे पाहण्याची उत्सुकता आहे’.
या सिनेमातील डायलॉग दिग्दर्शक नियाज मुजावर यांचे असून सिनेमाची कथा व पटकथा नियाज मुजावर, सचिन पुरोहित व अभिजीत कवठाळकर यांची आहे. तसेच झी म्यूजिक कंपनीने या चित्रपटातील गाणी रिलीज केली आहेत. पार्थ भालेराव आणि अभिनेता संजय खापरे ही नवी जोडी या सिनेमाच्या निमित्ताने पहायला मिळणार आहे. तसेच अभिनेत्री चित्रा खरे, गौरी कोंगे, अभिनेते सुहास शिरसाठ, उमेश जगताप यांच्याही भूमिका वाखाणण्यासारख्या आहेत.
संदीप पाटील यांनी छायांकनाची जबाबदारी सांभाळली आहे. भौमिक शहा यांनी या सिनेमासाठी कोरिओग्राफर म्हणून काम पाहिले आहे. सिद्धार्थ तातुस्कर यांनी कला-दिग्दर्शन सांभाळलंय तर वेशभूषा पूर्ती कुलकर्णी, रंगभूषा संतोष गिलबीले आणि संकलन मिलिंद दामले यांनी केलंय.