ख्यातनाम दिग्दर्शक उमेश कुलकर्णी यांचा उपक्रम


या कार्यशाळेमध्ये स्वतः उमेश कुलकर्णी आणि प्राध्यापक समर नखाते मार्गदर्शन करणार आहेत. ही कार्यशाळा प्रामुख्याने मराठी भाषेत आयोजित केली जाईल. यंदाचा राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त लघुपट ‘औषध’ याचे दिग्दर्शक अमोल देशमुख हे ‘शूट अ शॉर्ट’च्या मागील पर्वाचे विद्यार्थी. शूट अ शॉर्ट या त्यांच्या पहिल्याच कार्यशाळेनंतर बनवलेल्या पहिल्याच चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळणे ही आमच्यासाठी खूप अभिमानाची बाब असल्याचे उमेश यांनी सांगितले.
या संदर्भात बोलताना उमेश कुलकर्णी म्हणाले, “डिजीटल तंत्रज्ञान मुळे चित्रपट बनवणे ही गोष्ट तांत्रिकदृष्ट्या जरी सोपी झाली असली तरी एक कलामाध्यम म्हणून लघुपट तयार करणे ही आव्हानात्मक गोष्ट आहे. लघुपट निर्मितीसाठी केवळ तांत्रिककौशल्य पुरेसे नसून लघुपटाची मुलभूत संकल्पना, लघुपटाकडे कला व माध्यम म्हणून पाहण्याचा दृष्टीकोन याही बाबी उत्तम कलानिर्मितीसाठी आवश्यक असतात.”

लघुपट करण्याची इच्छा असणाऱ्यांना या कार्यशाळेत लघुपटनिर्मिती प्रक्रियेबाबत सर्वसमावेशक असे मार्गदर्शन केले जाणार आहे. लघुपटाचा संकल्पना ते निर्मितीपर्यंतचा प्रवास, लघुपट निर्मितीसाठीची आवश्यक पूर्वतयारी, शुटींगची प्रक्रिया तसेच कलाकार आणि तंत्रज्ञयांच्या सोबतची कार्यपद्धती, लघुपटाचे संकलन, महत्त्वाचे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सव, चित्रपट निर्मितीशी निगडीत असलेली इतर कलाक्षेत्र यावर सखोल चर्चा कार्यशाळेत केली जाईल. लघुपट निर्मितीत असणाऱ्या १८ वर्षांवरील सर्वांसाठी ही कार्यशाळा खुली असणार आहे. वळू, विहीर, देऊळ आणि हायवे अशा यशस्वी चित्रपटांनंतरही उमेश यांनी लघुपट बनविणे चालू ठेवले आहे. लघुपट या कलेला महत्व यावे म्हणून उमेश यांनी लघुपट गटाची स्थापना पुण्यात केली.

उमेश यांनी ‘क्लारमो फेरॉं, थाय आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सव, केरळ येथील आंतराष्ट्रीय माहितीपट आणि लघुपट महोत्सव अशा प्रतिष्ठित चित्रपट महोत्सवात जुरी सदस्य म्हणूनही स्थान भूषविलेले आहे. तसेच ‘क्लारमो फेरॉं’तर्फे त्यांच्या लघुपटांचे विशेष सादरीकरण करण्यात आले होते.
कार्यशाळेबाबत अधिक माहितीकरिता shootashortworkshop@gmail.com या ईमेलवर
अथवा ०२०-२५४३३५४९, ०९१६७६७७८०१, ०७३८७८११४४२ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.