पुरस्कारप्राप्त सिनेमा १५ जुलैपासून सिनेमागृहात!

संस्कृत स्कॉलर असलेल्या चक्रपाणी शास्त्री यांना उतारवयात स्मृतीभंशा (अल्झायमर) चा विकार होतो. वर्तमानाचा हात सोडून ते दुसर्याच गोष्टीत रमू लागतात. त्यातून मग सुरु होते ती, त्या व्यक्तीचा सांभाळ करणार्या कुटुंबाची कुचंबणा. वडील आणि मुलीचे असणारे अनोखे नाते हे या चित्रपटात मांडण्यात आले आहे. चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे, अभिनेत्री अमृता सुभाष, इरावती हर्षे, देविका दफ्तरदार आणि मिलिंद सोमण आदी कलाकारांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.

गौरिका फिल्म्सच्या शीला राव व डॉ. मोहन आगाशे यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. कथेतील आशयघनता हे मराठी चित्रपटाचे वैशिष्ट्य ‘अस्तु’ चित्रपटामुळे पुन्हा एकदा अधोरेखित होणार आहे.
या चित्रपटाला आजवर अनेक प्रतिष्ठेचे पुरस्कार मिळाले आहेत. यापूर्वी हा चित्रपट मर्यादित स्वरुपात प्रदर्शित करण्यात आला होता. मात्र, आता व्यापक पद्धतीनं ही कलाकृती प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याची गरज आहे. त्यासाठी हा चित्रपट पुन्हा प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला असून प्रेक्षकांनाही हा चित्रपट नक्कीच आवडेल,’ असं निर्मात्या शीला राव यांनी सांगितलं.