”ज्यांनी ‘ती फुलराणी’बद्दल आजवर फक्त ऐकलंच आहे त्यांच्यासाठी हे नाटक म्हणजे पर्वणी आहे आणि ज्यांनी ‘त्या’ काळात फुलराणी पाहिलंय, डोक्यावर घेतलंय आणि मनात साठवलंय त्यांच्यासाठी हा नाट्यप्रयोग म्हणजे एक अत्यंत सुखद अनुभूती आहे…” खास ‘रंगमैत्र’साठी ‘ती फुलराणी’ या नाट्यप्रयोगाबद्दल प्रसिद्ध सिने-नाट्य आणि टीव्ही मालिका कलावंत, लेखिका श्वेता पेंडसे यांनी व्यक्त केलेले मत…
जॉर्ज बर्नार्ड शॉ चे ‘पिग्मॅलियन’ पुलंच्या मनात घर करते काय… सतीश दुभाषी त्यांच्याकडे नाटकासाठी विचारणा करतात काय… पुलंना ते प्रो. हिगिन्सच्या भूमिकेत दिसतात काय आणि ‘ती फुलराणी’ नावाचा एक ‘मास्टरपीस’ त्यांच्या लेखणीतून उतरतो काय….!!! एखादी अजरामर कलाकृती निर्माण होण्यासाठी योग कसा आणि कुठे जुळून येईल हे सांगता यायचे नाही. भक्ती बर्वे, सतीश दुभाषी आणि अरविंद देशपांडे या दिग्गजांनी पुलंच्या या संहितेचं सोनं केलं. आज कित्येक वर्षांनी पुलंची ही फुलराणी तेवढ्याच ताकदीने रंगमंचावर जिवंत झाली आहे… नव्हे हेमांगी कवी, डॉ. गिरीश ओक आणि दिग्दर्शक राजेश देशपांडे यांनी ती जिवंत ‘केली’ आहे.

‘ती फुलराणी’ – पुलंच्याच शब्दात सांगायचे तर “स्वर आणि व्यंजन यांच्या ब्रम्हघोटाळ्यात अडकलेल्या माणसाची ही कथा”. बाल्कनीचे तिकीट निव्वळ साडेतीन रुपये असलेला तो काळ. शेवटचा शो संपल्यावर एका सिनेमा थिएटरबाहेर भर पावसात साधी भोळी पण ठसकेबाज मंजू (मंजुळा साळुंके) आपल्या गावरान बाजात गजरे विकत असते. योगायोगाने तिथे उपस्थित असलेले उच्चारशास्त्राचे अभ्यासक, प्राध्यापक अशोक जहागीरदार तिच्या भाषेचा लहजा, हेलकावे, लकबी टिपतात. तिथेच योगायोगाने त्यांची भेट डॉ. विश्वनाथ जोशी यांचेशी होते. यांचाही संबंध भाषाभ्यासाशी. दोघांच्या गप्पा रंगतात तशी मंजूची अखंड बडबड आणि खास गावंढळ भाषेतल्या टिप्पण्याही. या पोरीत काहीतरी वेगळे आहे, हे अशोकच्या लक्षात येते. निव्वळ तीन महिन्यात मंजूच्या भाषेवर संस्कार करून तिला राजघराण्यातील राजकन्या म्हणून आपण मिरवून दाखवू शकतो, असे ते बोलून जातात. आपली भाषा सुधारल्यावर असे रस्त्यावर गजरे विकण्याऐवजी फ्लोरीस्टाच्या दुकानात फुले विकायच्या, तिथे कामाला असलेल्या मुलींसारखं छान कपडे घालून गोडगोड बोलण्याच्या कल्पनेने मंजू हुरळून जाते. तडक दुस-याच दिवशी ती प्राध्यापक जहागिरदारांचे घर गाठते. गमतीत बोलून गेलेली गोष्ट आता त्यांच्यासमोर आव्हान म्हणून उभी राहते, डॉ. जोशी (विसुभाऊं)नी या कामात त्यांना आर्थिक सहाय्य करण्याचीही तयारी दाखवतात. आपला आजवरचा अभ्यास प्रत्यक्ष आयुष्यात आजमावून बघण्याची ही आयती संधी अशोकना दवडायची नसते. मंजूचा कायापालट करण्याचे आव्हान ते स्वीकारतात आणि सुरू होतो- गावठी मंजूपासून राजकुमारी मंजूपर्यंतचा अनोखा प्रवास.
पुलंच्या थोर लेखणीबद्दल मी पामर काय बोलणार? पूर्णतः अनोळखी असलेल्या व्यक्तींमध्ये अनाहूतपणे निर्माण होणारी आणि नंतर भावनिक पातळीवर हळूहळू दृढ होत जाणारी नाती त्यांनी सुरेख खुलवली आहेत. विसुभाऊ आणि अशोकची निखळ मैत्री असो, शामाबाई आणि मंजूमधलं मायेचं नातं असो की गुरुशिष्याच्या नात्याचं पावित्र्य जपतानाच अशोक आणि मंजूमधे त्यांच्याही नकळत आकार घेणारं, कधीच ओठावर न येणारं, आगळंच प्रेम असो, पुलंनी प्रत्येक नात्याची वीण ज्या पद्धतीने घातलीय त्याला तोड नाही. मूळ ‘पिग्मॅलीयन’मधे नात्यांच्या ह्या ‘इमोशनल डायमेन्शन’चा अभाव आहे. ओघवती भाषा, सुटसुटीत संवाद आणि खूपच साध्या शब्दात काहीतरी अफलातून मांडण्याची पुलंची पद्धत ह्यातच त्यांच्या नाटकांचं वेगळेपण आहे. कितीतरी वाक्य लगेच वहीत लिहून घ्यावी अशी. “व्वा!! व्वा!” म्हणताना प्रेक्षक थकतात पण मनाचा ठाव घेणारे संवाद येतच राहतात… अखेर पुलंची लेखणी ती..!! खरंच, असे संवाद हल्ली कुठे!!!

खरं म्हणजे कोणतेही नाटक पुनरुज्जीवित करणे हे एक आव्हानच असते आणि त्यातही जर प्रश्न ‘ती फुलराणी’सारख्या अजरामर कलाकृतीचा असेल, तर हे आव्हान कितीतरी पटीने मोठे होते. राजेश देशपांडे यांनी मात्र हे आव्हान लीलया पेलले आहे. आजवर त्यांनी अनेक दर्जेदार विनोदी नाटके रसिकांच्या भेटीला आणली आहेत; पण हे नाटक त्या साऱ्यांपेक्षा निश्चितच वेगळं आहे आणि त्यात रंग भरताना त्यांना स्वतःलाही जो आनंद मिळाला आहे तो संपूर्ण नाटकात जाणवतो. आपले वेगळेपण सिद्ध करण्याचा पोकळ अट्टाहास किंवा वरचढ होण्याचा खुळा खटाटोप असे काहीच हा प्रयोग बघताना जाणवत नाही. जाणवते ती केवळ मनापासून घेतलेली मेहनत, रचनांमधील ताजेपणा आणि कमालीची स्वाभाविकता आणि सगळ्यात महत्वाचे- संहितेचा आणि पात्रांचा केलेला सखोल अभ्यास! नाटकाच्या अस्सल ‘फ्लेवर’ला कुठेही धक्का न लावता, त्यांच्या दिग्दर्शकीय दृष्टीला दिसलेलं नाटक राजेश देशपांडेंनी अत्यंत प्रामाणिकपणे उभं केलं आहे. म्हणूनच एक पुनरुज्जीवित नव्हे तर नवं कोरं करकरीत नाटक आपल्यापुढे सादर होतं.
संहिता आणि दिग्दर्शन या दोहोंची सांगड घालून एक परिपूर्ण भूमिका निर्माण करण्यात या नाटकातील कलाकार पूर्णतः यशस्वी झालेत. अर्थात डॉ. गिरीश ओक, विजय पटवर्धन आणि हेमांगी कवी ही नावे समोर असता भूमिका जिवंत झाल्या नाही तरच नवल!
डॉ. गिरीश ओक यांनी साकारलेला प्राध्यापक अशोक जहागीरदार फारच अप्रतिम. वाचेवरील प्रभुत्त्व, आकर्षक व्यक्तिमत्व, दमदार आवाज या त्यांच्या ठायी असलेल्या गुणविशेषांचा अचूक उपयोग करून त्यांनी रुक्ष, आत्मकेंद्री अशोक तंतोतंत उभा केला आहे.
संपूर्ण नाटकात अशोकसोबत सावलीसारखे असणारे पात्र म्हणजे विसुभाऊ. बुद्धिवान, प्रांजळ आणि प्रेमळ विसुभाऊमधे विजय पटवर्धन यांनी अक्षरशः प्राण ओतलेत. डॉ. ओक आणि विजय पटवर्धन या दोघांची ‘केमेस्ट्री’ही अशोक आणि विसुभाऊंइतकीच छान नसती तर त्यांचे प्रसंग इतके भावले नसते. पण शेवटी अनुभव म्हणतात ते यालाच!
सुनील जाधव यांनी साकारलेला दगडोबा लक्षात राहतो. रांगडा, दारुबाज, लोभी दगडोबा आणि नंतर मानभावीपणे सन्मार्गाला लागलेला दगडू महाराज दोन्ही जबरदस्त. दिशा दानडे, अंजली मायदेव, रसिका धामणकर, मीनाक्षी जोशी, प्रांजळ दामले, निरंजन जावीर, हरीश तांदळे, नितीन नारकर या कलाकारांनीही त्यांच्या वाटेला आलेल्या भूमिका समरसून केल्या आहेत.
हेमांगीचे कौतुक करायला मात्र शब्द कमी पडावेत. तिचे अभिनयकौशल्य रसिकांपासून लपलेले नाहीच. आजवर कितीतरी चित्रपटातून आणि नाटकातून तिने रसिकांच्या मनावर तिची एक स्वतंत्र छाप सोडली आहे. पण ही भूमिका साकारताना तिने घेतलेली प्रचंड मेहनत पदोपदी दिसते. कितीही नाही म्हटलं तरी भक्ती ताईंनी केलेल्या फुलराणीशी तुलना होणारच आणि ‘याचा अजिबात विचार करायचा नाही’ असं पक्क ठरवलं तरी खोल कुठेतरी दडपण येणारच. पण हेमांगीचे काम बघता तिच्यावर असे कुठले दडपण आहे किंवा असेल क्षणभरही वाटत नाही.
रंगमंचावर प्रवेश करताच तिच्या पहिल्या वाक्यासरशीच तिच्यातला आत्मविश्वास प्रेक्षकांच्या मनाचा ताबा घेतो. काही क्षणात सबंध रंगमंचावर ही फुलराणी राज्य करते. आपल्या गावठी लह्ज्याने जितक्या स्वाभाविकपणे ती प्रेक्षकांना हसवते, तितक्याच सहजतेने बालकवींची कविता म्हणताना त्यांना हळवं व्हायला भाग पाडते. अवखळ, अल्लड मंजूचा एका सुजाण, समंजस आणि भावनाप्रधान मंजुळेपर्यंतचा प्रवास बघताना तिच्यातल्या अत्यंत गुणी अभिनेत्रीची पुन्हा एकदा ओळख पटते. हेमांगी स्वतः उत्तम नृत्यांगना आहेच आणि संपदा जोगळेकर-कुलकर्णी यांच्या समर्थ नृत्य दिग्दर्शनामुळे तिच्या हालचालींना आणखीच बहार आली आहे. हेमांगी मंजू अक्षरशः जगली आहे. नुकताच तिला मिळालेला ‘झी’चा अवॉर्ड हे तर निव्वळ टोकन आहे. या भूमिकेमुळे यशाची असंख्य दालने तिने स्वतःसाठी खुली केली आहेत, यात वाद नाही.
संदेश बेंद्रे यांचे नेपथ्य साजेसे आहे. फुटपाथ ते राजमहाल सारेच छान. फक्त सेट बदलायला लागणारा वेळ आणखी कमी करता येईल का ह्याकडे त्यांनी जरा लक्ष द्यावे असे वाटते. नाटकाचे तंत्र आता प्रगत आहे. काहीतरी शक्कल काढल्यास अंधाराचा कालावधी कमी होऊन प्रयोग आणखी नेटका होऊ शकतो. वेशभूषेच्या बाबतीतही अशीच एखादी युक्ती करावी असे दोन ठिकाणी वाटते. तेवढे सोडल्यास महेश शेरला यांनी त्यांच्या नेहमीच्या अभ्यासपूर्ण पद्धतीने केलेली वेशभूषा फारच भावते. सुरेख रंगसंगती निवडल्याने नाटकाला ‘फ्रेश लुक’ येतो. फक्त नाटक ज्या काळात घडते तो बघता, काही साड्यांचे आणि ड्रेसेसचे प्रिंट आणि डिझाईन्स जरा वेगळे असायला हवे होते असे वाटते. दांडगा अनुभव आणि अमाप प्रतिभा गाठीशी असताना कालानुरूप जुने पण तरीही वेगळे डिझाइन्स करणे महेश यांच्यासाठी कठीण नाही. भूषण देसाई यांची प्रकाशयोजना नेहमीप्रमाणेच सुरेख. उदय तांगडी यांच्या रंगभूषेने प्रत्येक पात्राला वेगळी ओळख मिळाली आहे. निषाद गोलाम्बरे यांचे संगीत छान. प्रसंगाचा हवा तो परिणाम साधण्यासाठी कवितांचा सांगीतिक वापरही आवडतो.
ज्यांनी ‘ती फुलराणी’ बद्दल आजवर फक्त ऐकलंच आहे त्यांच्यासाठी हे नाटक म्हणजे पर्वणी आहे आणि ज्यांनी ‘त्या’ काळात फुलराणी पाहिलंय, डोक्यावर घेतलंय आणि मनात साठवलंय त्यांच्यासाठी हा नाट्यप्रयोग म्हणजे एक अत्यंत सुखद अनुभूती आहे. अगदी ठरवून तुलना करण्याच्या हेतूने गेलेल्या रसिकांनाही त्याचा विसर पाडण्याची ताकद ह्या सादरीकरणात आहे. तरीही कोणाला टीकेतच अडकायचं असेल तर ते त्यांचे दुर्भाग्य!
‘ती फुलराणी’सारखे अप्रतिम नाटक पुन्हा जिवंत करण्याचा धाडसी आणि मोलाचा निर्णय घेतल्याबद्दल निर्माते धनंजय चाळके आणि दिग्दर्शक राजेश देशपांडे यांचे मनापासून आभार आणि नाटकाच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा!
-श्वेता पेंडसे