सतत कामाच्या ताणापायी आणि विवंचनांपायी शिणलेल्या डोक्याला जरा विश्रांती द्यायची असेल तर ‘आलाय मोठा शहाणा’ एक उत्तम पर्याय आहे. मनाला न पटणाऱ्या कितीतरी गोष्टी त्या दोन तासात रंगमंचावर घडतात, पण मुळात बुद्धीच्या कसोटीवर घासून बघण्याचं हे नाटकच नाही. केवळ मनोरंजन आणि मनोरंजन हा एकमेव उद्देश या निर्मितीमागे आहे आणि यातील कलावंत तो पुरेपूर साध्य करतात.

दादासाहेब हे एक बडं प्रस्थ. साम-दाम-दंड-भेद सगळं वापरून हवं ते मिळवणे, असा त्यांचा स्वभाव आणि सवय दोन्ही. त्यांची मुलगी सिंड्रेला ही श्रीमंतीत वाढलेली आणि अत्यंत लाडावलेली. सिनेमाच्या नादी लागल्यामुळे ती कितीतरी वर्षे दहावीची परीक्षा पास होऊ शकत नाही. गुलाबरावशी तिचे लग्न ठरले असले तरी दहावी पास झाल्याखेरीज हे लग्न होऊ शकत नसते. अखेर तिला शिकवणी देण्यासाठी एका गरीब (स्वभावाने) मास्तरला घरात बळजबरी बंदिस्त केले जाते. आधीच्या मास्तरांची झालेली अवस्था सांगून त्याला घाबरविले जाते. त्यात ज्याचे प्रेत अजून सापडले नाही, अशा गणपुले मास्तरचे भूत त्याला सारखे छळते. सिनेमा नसानसात भिनलेल्या मुलीला शिकवणी देण्याच्या दिव्यातून जाताना या बिचाऱ्या मास्तरची होणारी दुर्दशा म्हणजेच – आलाय मोठा शहाणा. पुढे ती दहावी पास होते का? मास्तर तिथून जिवंत बाहेर पडतो का? तिचे लग्न होते का? हे सगळे नाटकातच बघावे.
हे नाटक म्हणजे खास ‘संतोष पवार प्ले’ आहे. त्यांच्या विनोदांची शैली सगळ्यांना सुपरिचित आहे आणि कसलाही विचार न करता फक्त दिसतंय ते एन्जॉय करायचं, हे ठरवून आलेल्या प्रेक्षकांना खळखळून हसवण्यात ते इथेही यशस्वी होतात. विनोदाच्या जोडीला या नाटकात एक इंटरेस्टिंग सस्पेन्स अँगलसुद्धा टाकण्यात आला आहे.
मास्तरच्या भूमिकेत आशिष पवार आपली संपूर्ण ऊर्जा पणाला लावतो. त्याच्या हक्काच्या जागा तो व्यवस्थित वसूल करतो. खरं म्हणजे हे नाटक त्याचंच आहे आणि तो ते त्याचं बनवून घेतोही. तो हे नाटक एका हाती घेऊन जातो असं म्हटलं तरी अतिशयोक्ती ठरणार नाही. संतोषची दिग्दर्शनाची शैली आणि आशिषचे ‘प्लस पॉइंट्स’ याचं परफेक्ट कॉम्बिनेशन म्हणजे यातील ‘मास्तर’. आशीष एवढाच लक्षात राहतो, तो आनंदा कारेकरचा, स्वतःला सुपरहिरो समजणारा, लोभस गुलाबराव. त्याच्या प्रत्येक एन्ट्रीला कडकडून टाळ्या पडतात. सात्विक चेहरा, त्या चेहऱ्यावर एरव्हीसुद्धा असणारं त्याचं ‘सिग्नेचर’ स्मितहास्य आणि त्याची सडसडीत शरीरयष्टी याचा एवढा सुरेख वापर त्याने केलाय. एकीकडे ‘श्री योगी’ मधील भूमिका आणि दुसरीकडे हा गुलाबराव, हा तोच आनंदा आहे यावर क्षणभर विश्वास बसत नाही. शिवाय त्याच्यासाठी खास बनवलेल्या सुपरहिरो कास्च्युमचा यात फार मोठा हात आहे. त्यासाठी महेश शेरला यांना १०० मार्क्स.

अपूर्वा नेमळेकर- देशपांडे हिने सिंड्रेला म्हणून उत्तम साथ दिलीय. खरोखर ती सिनेमापायी वेडी झालेली मुलगीच वाटते. संपदा जोगळेकर- कुळकर्णी यांच्या सुरेख नृत्यदिग्दर्शनाखाली तिच्यातले नृत्यकौशल्य दाखवण्याची संधीही तिने चांगलीच कॅश केलीय. महेश कोकाटे (दादासाहेब), मनीषा चव्हाण (मामी), विनोद दाभिळकर (गणपुले) यांनीही समरसून भूमिका केल्या आहेत. नितीन जाधवचा एनर्जीटिक पंप्याही त्याच्या हक्काच्या टाळ्या घेतोच. सगळ्या कलावंतांचं टीमवर्क आणि केमेस्ट्री उत्तम!
नाटक वेगळ्याच अंगाने जात असल्याने कितीतरी गोष्टी सोडून दिल्या जातात… द्याव्या लागतात असे म्हणूया. मुळात नाटकाचे कथाबीज फारच छोटे आहे, मग लेखनात खुलवून खुलवून त्याला खुलवणार तरी किती? वैभव परब यांनी एक उत्तम साचा दिलाय. नाटकात खरा जीव ओतलाय, तो नाटक बसवताना… आणि ते जाणवते. दिग्दर्शकानंतर प्रत्येक कलाकाराकडूनही आपापल्या पात्राला खुलवण्याच्या दृष्टीने काही गोष्टींची भर पडतेच. या सगळ्याचा एकूण परिणाम म्हणजे लोक नाटक एन्जॉय करतात पण काही ठिकाणी मात्र विनोदातील तोच तो पणा खटकतो. काही ठिकाणी विनोद प्रेडीक्टेबल झाल्याने नाटक रेंगाळतेय असेही वाटते. ‘सैराट’मधील वाक्यांची तर अक्षरशः काही गरज नाही. शिवाय वाचिक अभिनयापेक्षा जेथे आंगिक अभिनयाने विनोदनिर्मिती केली जातेय, अशा वेळी अपेक्षित परिणाम साधण्यासाठी पार्श्वसंगीताचा फार मोठा हात असतो. या नाटकाची ती बाजू दुबळी वाटते. अमिर हडकर यांनी शीर्षकगीत छान तयार केले असले तरी प्रत्येक वेळी केवळ त्याचा उपयोग करणे पुरेसे नाही. नेपथ्यसुद्धा आहे त्यापेक्षा नक्कीच छान होऊ शकते. भरपूर प्रयोग अंगावरून गेल्यामुळे आता सेट सवयीचा झालाय आणि म्हणूनच प्रत्येक कलाकार मनसोक्त बागडतो. फक्त त्यामुळे काही प्रसंग आणि रचना विस्कळीत होतायत याचे भान त्यांनी ठेवायलाच हवे. ते इथे होत नाही. हे सारे मुद्दे असूनही लोकांचे मनोरंजन करण्यात नाटक कमी पडत नाही. प्रेक्षकांचा प्रतिसादही उत्तम मिळतोय, म्हणूनच कदाचित या बाबींकडे दिग्दर्शकाने आवर्जून असे लक्ष दिले नसावे. मात्र या काही गोष्टींवर पुनर्विचार करता सादरीकरणाचा दर्जा नक्कीच उंचावेल.
अशोक दगडू शिगवण हे नाव आता कित्येक चांगल्या नाटकांच्या निर्मितीशी जोडले गेलेय. ‘आलाय मोठा शहाणा’ या ताज्या खुसखुशीत नाटकाचेही जास्तीत जास्त प्रयोग होवोत, यासाठी संपूर्ण टीमला शुभेच्छा!
-श्वेता पेंडसे