सुजाता केळकर यांच्या कलाकृतींचे प्रदर्शन सुरू
मुंबईस्थित सुप्रसिद्ध चित्रकार सुजाता अभय केळकर यांच ‘परसुएट ऑफ लाईट’ हे चित्रप्रदर्शन मुंबईच्या नेहरू सेंटर आर्ट गॅलरीमध्ये ५ जुलैपासून सुरू झाले असून, ते १० जुलै २०१६ पर्यंत सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत रसिकांना बघता येणार आहे.
चित्रकार सुजाता यांनी अलिकडच्या काळात साकार केलेल्या चित्रकृती सदर प्रदर्शनात मांडल्या गेल्या आहेत. चित्रकर्तीने जीवनातल्या उभ्या आडव्या प्रवासात शोधलेले सत्य आणि निर्माण झालेल्या भावनांचा धांडोळा या प्रदर्शनात मांडलेल्या चित्रांमध्ये पहाता येईल. या दरम्यान गाढ प्रेम, विश्वास आणि स्वीकृती यांचा अमीट ठसा त्यांच्यावर उमटला आणि तो या चित्रांमधून प्रतीत झाला आहे.
आर्किटेक्ट म्हणून काम करताना चित्रकार सुजाता केळकर यांनी आपल्यातला कलाकार जपला होताच पण गेल्या पाच वर्षांपासून त्यानी चित्रकारीतेला वाहून घेतले आहे. चित्रांच्या माध्यमातूनच त्या आपल्या भावना, मन:स्थिती, विचार कॅनव्हासवर व्यक्त करीत आल्या आहेत, या प्रदर्शनात त्याचेच प्रतिबिंब आपल्याला पहायला मिळेल.
प्रकाशाच्या माध्यमातून विविध भाव-भावना आणि मनोव्यापारयांच यथार्थ दर्शन चित्रकार सुजाता यांच्या चित्रांमधून घडतं. छाया-प्रकाशाचा अविष्कार, खिडकी, कुंपण, दरवाजा, व्हरांडा आणि मोकळं आवार यांच्या माध्यमातून ही चित्रं उभी केली आहेत.
एक चित्र हजारो शब्दांपेक्षा प्रभावी ठरतं आणि त्याचा आस्वाद घेता येतो काळाचा ठसा उमटलेल्या या कलाकृती पाहताना मुंबईकर कलारसिकांना नक्कीच आनंद मिळेल. या प्रदर्शनाच्या माध्यमातून जमणारा सर्व निधी विज्ञानवाहिनी, निर्मया पब्लिक चारिटेबल ट्रस्ट, वनवासी कल्याण आश्रमाला देण्यात येणार आहे.