लाल मातीतील कुस्तीच्या डावपेचांची दंगल

राघूजन फिल्म्स, रोअरिंग गोट मीडिया आणि एनएमआर मूव्हिस या बॅनर अंतर्गत निर्माते सुदर्शन लक्ष्मण इंगळे, संजय मुळे, जयआदित्य गिरी आणि नितीन मधुकर रोकडे यांनी ‘तालीम’ चित्रपटाची निर्मिती केली आहे.
आजच्या पिढीला केवळ मेटवरील कुस्ती ठाऊक आहे, पण खरी कुस्ती लाल मातीतच खेळली जाते. लाल मातीतील कुस्तीचा आनंद निराळाच असल्याचं सांगत रोकडे म्हणाले, ‘या चित्रपटाची कथा जरी कुस्ती या खेळाला केंद्रस्थानी ठेवणारी असली तरी यात बरेच मुद्दे हाताळण्यात आले आहेत. बरीच वर्षे झाली मराठी चित्रपटात कुस्ती दिसली नसल्याने ‘तालीम’मध्ये कुस्ती दाखवली जाणार आहे, असंही नाही. कथेची गरज असल्यानं कुस्ती या चित्रपटात आहे. कोणतीही कथा यशस्वीपणे पडद्यावर सादर करण्यासाठी अचूक लोकेशन्सची आवश्यकता असते, त्यामुळे ‘तालीम’साठी पोषक असलेल्या लोकेशन्सचा शोध आमच्या टिमने घेतला. त्यानुसार भोर, जुन्नर, कुंडल-सांगलीमध्ये चित्रीकरण केलं आहे. या चित्रपटातील लोकेशन्स आजतरी कधीही पडद्यावर आलेले नसल्याने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेण्यात यशस्वी होतील याबाबत शंका नाही. ‘तालीम’चा विषय आजच्या तरूणाईपासून ज्येष्ठांनाही आवडेल असा आहे. या विषयाला सुमधुर गीत-संगीतासोबतच आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्यात आली आहे.’’
