१४ जुलैला येतेय रंगभूमीवर!
‘प्रेम नाम है मेरा प्रेम चोप्रा’ व ‘प्रपोजल’ या यशस्वी नाटकानंतर निर्माती कल्पना विलास कोठारी रंगनील प्रॉडक्शनच्या बॅनरखाली ‘अतिथी देवो भव:’ हे नर्मविनोदी नाटक घेऊन येत आहेत. या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग गुरुवार दि. १४ जुलैला दुपारी ४ वाजता शिवाजी मंदिर, दादर येथे होत आहे.
या नाटकाचे दिग्दर्शन सुप्रसिद्ध दिग्दर्शक विजय केंकरे यांनी केले असून, वैभव अर्जुन परब यांनी लेखन केले आहे. गेली अनेक वर्ष नाट्य व चित्रपटसृष्टीत यशस्वीरित्या कार्यरत असलेले दिग्दर्शक विजय केंकरे यांचं हे नाटक म्हणजे धमाल मनोरंजन असणार हे ओघाने आलंच. पण मनोरंजनाबरोबरच एक चांगला संदेशही या नाटकाद्वारे प्रेक्षकांना मिळणार आहे.

या नाटकाची कथा आप्पा नेने यांची आहे. आप्पा नेनेंच्या मुलीचं लग्न मोडलेल्या घरात साखरपुड्याच्या आदल्या दिवशी भाऊ मालवणकर हा पाहुणा अचानक आलेल्या पावसाप्रमाणे हजर होतो. आणि पुढे काय गंमत होते हे प्रत्यक्षात नाटकात पाहायला मिळेलच. लग्न संस्कृतीवर आधारित प्रत्येकाला विचार करायला लावणारं हे एक हलकं फुलकं विनोदी नाटक आहे. घराघरात घडणारा हा विषय असून हसता हसता अंतर्मुख करणारं हे नाटक सर्वच वयोगटातील प्रेक्षकांचं उत्तम मनोरंजन करील असा निर्माते – दिग्दर्शकांना विश्वास आहे.

या नाटकाचे पार्श्वसंगीत नितीन कायरकर यांचे असून नेपथ्य प्रदीप सुळे, सहाय्यक दिग्दर्शक निलेश रानडे, समीहा सुळे, प्रकाशयोजना राजन ताम्हाणे, वेशभूषा मंगल केंकरे, प्रसिद्धी दिपक जाधव यांची असून सुत्रधार गोट्या सावंत हे आहेत.
चांगली संहिता, उत्तम अभिनेते, नेत्रसुखद नेपथ्य, संगीत आणि दिग्दर्शन या सर्व बाजूंनी परिपूर्ण असं हे नवीन धम्माल नर्म विनोदी नाटक ‘अतिथी देवो भव:’ प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यास येत आहे.