१५ ऑगस्टपर्यंत महिनाभर राबवणार मोहीम!
‘गणवेश’च्या निमित्तानं एक विशेष पाऊल उचलून समाजातल्या कोणत्याही घटकाने आत्महत्या करू नये म्हणून एक चळवळरुपी मोहीम आखून १५ जुलै ते १५ ऑगस्टदरम्यान भारतीय स्वातंत्र्यदिनाला खऱ्या अर्थानं मानवंदना दिली जाणार आहे.

भारताला स्वातंत्र्य मिळून ६६ वर्षे पूर्ण झाली. आज जगात भारत एक जागतिक महासत्ता बनण्याच्या मार्गावर आहे असं म्हटलं जातं. स्वातंत्र्योत्तर काळात आपल्या देशाने फार प्रगती केली ही झाली एक बाजू. दुसऱ्या बाजूला आहेत बेकारी, गरिबी, भ्रष्टाचार, महागाई अशा एक ना अनेक समस्या. आजही एखादा गरिब भारतीय माणूस त्याची अगदी किरकोळ गरज भागवायची असलीतरी हतबल होतो. शेपाचशे रूपये त्याला एखाद्या डोंगरासारखे वाटू लागतात. स्वातंत्र्यानंतर प्रत्येक भारतीयाला वाटत होते की लुबाडणारे इंग्रज गेले आता आपल्या सगळ्या समस्या दूर होणार, आपण सुखी होणार. पण तसे झाले का?
‘गणवेश’ची कथाही असेच काही प्रश्न आपल्यासमोर घेऊन येते, ती तीन वेगवेगळ्या पात्रांच्या माध्यमातून. पहिला आहे एक विटभट्टी कामगार सुरेश. सुरेशचा मुलगा मध्या येत्या पंधरा ऑगस्टला शाळेत भाषण करणार आहे ज्यासाठी त्याला गरज आहे फक्त एका गणवेशाची. दुसरी आहे मिरा, एक प्रामाणिक आणि कर्तव्यदक्ष तरूण पोलिस अधिकारी. आणि तिसरी कथा आहे देशभक्त विनायकराव देशमुख ह्या प्रामाणिक राजकीय नेत्याची. तिन पात्रांच्या तिन वेगवेगळ्या परंतु एकमेकांशी संबंधित असणाऱ्या कथांच्या माध्यमातून भारताच्या राजकीय, सामाजिक, आर्थिक परिस्थितिचा संदर्भ घेत गरिबी, भ्रष्टाचार, बेरोजगारी अशा वेगवेगळ्या प्रश्नांची आणि त्याच्याशी संबंधित सामान्य भारतीयांच्या जगण्याची उकल करून देणारी सरळ साधी कथा गणवेशच्या रूपात पहायला मिळते.
बधीर झालेल्या समाजाला जागं करायचं असेल, बोथट झालेल्या जाणिवांना पुन्हा ऊर्जा द्यायची असेल तर काहीतरी संवेदनशील आणि तितकेच कल्पक चित्र समाजासमोर ठेवायला हवे. हाच ध्यास घेऊन अतुल चंद्रकांत जगदाळे या तरुणाने ‘गणवेशची निर्मिती केली आहे.
अभिनेता किशोर कदम, स्मिता तांबे, मुक्ता बर्वे, गणेश यादव, दिलीप प्रभावळकर, नागेश भोसले, गुरु ठाकूर, सुहास पळशीकर, शरद पोंक्षे आणि बालकलाकार तन्मय मांडे या एकापेक्षा एक अशा दिग्गजांना घेऊन ही अविस्मरणीय कलाकृती रसिकांसमोर त्याने ठेवली आहे. दिग्दर्शक सिनेमॅटोग्राफर असल्याने चित्रांवर विशेष हुकूमत साधत नवा रंग भरला आहे.
अतुल जगदाळे यांच्या ‘विजयते एंटरटेनमेंट’ निर्मित आणि ‘इरॉस इंटरनॅशनल’ प्रस्तुत ‘गणवेश’ चित्रपटाचे २४ जून रोजी भव्य प्रमाणात महाराष्ट्रात प्रदर्शन झाले. या चित्रपटाने पहिल्या दिवसापासूनच ‘बॉक्स ऑफिस’वर किमया साधत जाणकार आणि रसिकप्रेक्षक यांची पसंती मिळवून जोरदार बाजी मारली. रसिकांकडून मिळणारा प्रतिसाद हा दर्जेदार कलाकृतीला उभारी देणारा ठरला आणि कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, नगर, औरंगाबाद, लातूर, उस्मानाबाद, अमरावती, नागपूर, वर्धा, यवतमाळसह पुणे व ठाणेकरांच्या पसंतीस खरा उतरला. चित्रपटातील कलाकारांचा जिवंत अभिनय आणि अप्रतिम कथाबीज, सोबत तितकेच मनमोहक सादरीकरण अश्या जमेच्या बाजू असलेल्या गणवेशाला मिळणारा प्रतिसाद पाहता उत्तम आणि दर्जेदार ते प्रेक्षक स्वीकारणारच याचं उत्तम उदाहरण म्हणजेच ‘गणवेश’. अल्टीयस सॉफ्ट कंपनीचे ऑनलाइन मीडिया स्पेशालीस्ट समीर भोसले आणि त्यांची टिम गणवेशसाठी सोशल मीडियावर नवनव्या कल्पना राबवून तरूणाईला आकर्षित करीत आहेत.