अत्रे रंगमंदिरात होणार मिनी थिएटर, तीन तालिम हॉल;
कल्याण-डोंबिवलीत खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांचा पुढाकार
कल्याण आणि डोंबिवली शहरांमधील रंगकर्मींना भेडसावणाऱ्या विविध समस्यांची खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि महापौर राजेंद्र देवळेकर यांनी दखल घेतली असून, एका रंगमंचावर आलेल्या नाट्यकलावंतांना हा प्रयोग दिलासा देणारा ठरला आहे.

रंगभूमीला भेडसावणाऱ्या विविध समस्या शहरातील रंगकर्मींच्या वतीने दिग्दर्शक विजू माने यांनी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यासमोर मांडल्या होत्या. हौशी रंगभूमी, बालरंगभूमी, व्यावसायिक रंगभूमी अशा परिप्रेक्ष्यात काम करणाऱ्या विविध संघटना असून या सगळ्यांना एकत्र येण्याची सूचना खा. डॉ. शिंदे यांनी केली होती. त्यानुसार या सर्वांना घेऊन खा. डॉ. शिंदे यांनी गुरुवारी आयुक्त ई. रवींद्रन आणि महापौर राजेंद्र देवळेकर यांच्यासह बैठकीचे आयोजन केले होते.
बैठकीत विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी आपल्या समस्या मांडल्या. मुख्य समस्या तालमीसाठीच्या जागेची, तसेच प्रयोग सादर करण्यासाठी हक्काचे व्यासपीठ नाही, हे स्पष्ट झाल्यानंतर लगेचच आचार्य अत्रे रंगमंदिराची पाहाणी करण्याचा निर्णय खा. डॉ. शिंदे यांनी घेतला. या पाहाणीत अत्रे रंगमंदिरात बरीच मोकळी जागा असल्याचे लक्षात आले. पहिल्या मजल्यावरील दोन्ही डॉर्मिटरीज विनावापर पडून आहेत. या डॉर्मिटरीजच्या जागी १५० आसन क्षमतेचे मिनी थिएटर आणि तालिम हॉल तयार करण्याचा निर्णय याप्रसंगी घेण्यात आला.

या बैठकीला सभागृह नेते राजेश मोरे, स्थायी समिती सभापती संदिप गायकर, कल्याण-डोंबिवली महानगरप्रमुख विजय साळवी, कल्याण शहरप्रमुख विश्वनाथ भोईर, ज्येष्ठ रंगकर्मी रवींद्र लाखे, दिग्दर्शक विजू माने, अभिनेते कुशल बद्रिके, रंगकर्मी अभिजीत झुंझारराव, अ. भा. मराठी नाट्य परिषदेच्या डोंबिवली शाखेचे अध्यक्ष दिलीप गुजर, उपाध्यक्ष भारती ताम्हणकर, सहकार्यवाह प्रमोद पवार, कल्याण शाखा कार्यवाह सुरेश पवार, बोधी नाट्य परिषदेचे अशोक हंडोरे, बालरंगभूमीशी संबंधित दिपाली काळे, नाट्य निर्माता संघाच्या वतीने आनंद म्हसवेकर, धनंजय चाळके, राम दौंड, चारुदत्त भोर आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रायोगिक आणि बालरंगभूमीवरील रंगकर्मींना व्यावसायिक दर परवडत नाहीत, त्यामुळे तालमीसाठी आणि प्रयोगांसाठी भाड्यात सवलत देण्याचा मुद्दा अनेक रंगकर्मींनी मांडला. त्यासंदर्भात भाडेनिश्चितीसाठी समिती स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे महापौर श्री. देवळेकर यांनी स्पष्ट केले. या समितीत रंगकर्मींच्या प्रतिनिधींचाही समावेश करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. या समितीमुळे प्रायोगिक आणि बाल रंगभूमीला सवलतीच्या दरात तालिम आणि प्रयोगांसाठी जागा उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.