सिनेमेकर्स करणार तुमच्या वेडेपणाचा सन्मान
चित्रपटाच्या प्रोमोशनसाठी वेगवेगळे प्रयत्न मराठी सिनेसृष्टीतही होऊ लागले असून, १२ ऑगस्टला सर्वत्र प्रदर्शित होणाऱ्या YZ चित्रपटांच्या टीमने जरा हटके शक्कल लढवली आहे. आत्तापर्यंत चित्रपटांना अवॉर्ड्स मिळत आले आहेत पण YZ या हटके नाव असलेल्या हटके चित्रपटाकडूनच सिनेरसिकांना ‘YZ अवॉर्ड्स’ अवॉर्ड्स दिले जाणार आहेत.

तुमच्याकडे जर एखादी भन्नाट कला, छंद, शोध किंवा एखादा अभिनव उपक्रम म्हणजे एखादं सामाजिक कार्य, भन्नाट कलाप्रकार की जो जोपासण्यासाठी तुम्ही अक्षरशः वेडे झाले आहात तर या ऍवार्ड निवड प्रक्रियेसाठी तुम्ही तुमची एंट्री देऊ शकता. त्यातून दहा विजेते एका पॅनेलमार्फत निवडले जातील. १२ ऑगस्टला प्रदर्शित होणाऱ्या आगामी YZ या चित्रपटाच्या टीमकडून, चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या पार्श्वभूमीवर जरी हे अवॉर्ड्स दिले जाणार असले तरी आता दरवर्षीच हे अवॉर्ड्स देण्यात येतील.
भन्नाट गोष्टीचा भन्नाट ध्यास घेतलेली कोणतीही व्यक्ती, संस्था या स्पर्धेत सहभागी होऊ शकते. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी १५ जुलै ते २८ जुलै या काळात प्रवेशिका पाठवायच्या आहेत. विजेत्यांना आणि त्यांच्यातील YZ पणाला ट्रॉफी आणि आकर्षक बक्षिसांनी सन्मानित केलं जाईल . आम्हाला आपली माहिती आणि आपण करत असलेल्या भन्नाट गोष्टीचा प्रूफ वजा फोटो yzawards2016@gmail.comया पत्त्यावर मेल करा किंवा facebook.com/yzthefilm इथे मेसेज करा .
निर्माते, एव्हरेस्ट एंटरटेनमेंटचे संजय छाब्रिया आणि प्रतिसाद प्रॉडक्शनचे अनीश जोग यांच्या YZ या अत्यंत चर्चेत असलेल्या चित्रपटाचं लेखन क्षितिज पटवर्धन आणि दिग्दर्शन समीर विद्वांस या जोडीनं केलं असून चित्रपटात सागर देशमुख, अक्षय टांकसाळे, सई ताम्हणकर ,पर्ण पेठे आणि मुक्ता बर्वे हे सगळेच आपल्या कसदार अभिनयातून नेहमीपेक्षा खूपच वेगळ्या भूमिकांमधून दिसणार आहेत .