
गडकरी रंगायतनला ‘वाडा चिरेबंदी’ आणि ‘मग्न तळयाकाठी’ हे सलग दोन नाट्यप्रयोग शनिवारी (१६ जुलै) पाहिले. यापूर्वी महेश एलकुंचवारांच्या या ‘नाट्यत्रयी’विषयी केवळ ऐकले होते. काल सलग दोन नाटकांचा अनुभव म्हणजे काही तासांत १० वर्षांचा काळ लोटल्याचा अनुभव घेतला.
तो वाडा, ते गाव, ते तळं, तो ट्रॅक्टर या सगळ्यात गुंतून गेले होते आणि कधी त्या वाड्यातील एक झाले समजलंच नाही त्या वाड्यानेही आपलं समजून त्याची कथा ऐकवली… अगदी सखोल…
दृष्टीसमोर दिसणारा वाड्याचा पुढचा भाग आणि संवादातून दिसणारा मागचा आणि वरच्या माडीचा भाग, इतकंच काय तर तो मळा, ते शेत आणि ते आठवणींचं तळही फिरून आले… नाटकाचं कथानक आजच्या काळाशी किती समर्पक!मुळात कुठल्याही काळात चपखल बसणारं…

‘विश्वनाथा, किती वाजले?’ हे एकच वाक्य सतत म्हणणाऱ्या आजीपासून दिसणारी ही वंशावळ, नाटकाच्या सुरवातीपासूनच प्रत्यक्ष नसले तरी संवादातून जाणवणारे तात्या, बाईपणाची सगळी कर्तव्ये सोसून नंतर मरणाकडे डोळे लावून बसलेली आई, कर्तव्य आणि मानापमान यांत गुंतलेला मोठा भाऊ, जबाबदार वहिनी, मुंबईत राहणारा धाकटा भाऊ, त्याची पत्नी, शिक्षणासाठी तडफडणारी आणि शेवटपर्यंत अविवाहित राहिलेली बहीण. संपूर्ण आयुष्य निस्वार्थीपणे आपले कर्तव्य पार पाडणारा तिसरा भाऊ चंदू, स्वप्नील जगात वावरणारी अस्वस्थ रंजू, शिकलेला अभय आणि परिस्थितीच्या चटक्यांनी दणकट झालेला पराग यांचे सुरेख व्यक्तीचित्रण पहायला, अनुभवायला मिळाले.
प्रदीप मुळे काका, नेपथ्यासाठी Hats off!! आधीचा मरणासन्न वाडा आणि नंतर त्याचे पालटलेले रूप अप्रतिम! आधीचा मंद, कंदिलाचा किणकिणता प्रकाश आणि अधिक काळोखा अंधार, पात्रांची मनोवस्था आणि जीवनातील अंधार दाखवणारी त्याला साथ त्या मिणमिणत्या उजेडाच्या आशेची आणि काळ लोटल्यावर आलेली सुबत्ता, वाढलेली कृत्रीमता प्रकाश योजनेतून अतिशय सुंदर बहरून आली.
चंद्रकांत कुलकर्णी यांनी नव्वदीच्या दशकात कोल्हापूरात ‘वाडा’ची नाट्यत्रयी सलग सादर केली होती. आता पुन्हा तेच लेखक, दिग्दर्शक नव्या काळात, नव्या कलाकारांच्या संचात जुन्या-नव्याचा एकत्रित सुंदर मेळ घालताना दिसतात. चंदू सरांच्या प्रत्येक कलाकृतीत संहितेची आणि पात्र कलाकारांची निवड हा अतिशय महत्वपूर्ण भाग असतो. सर्वच कलाकार चपखल बसलेत त्यांच्या भूमिकेत.
वाडा आणि मग्न तळयाकाठीच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन! आता तिसऱ्या भागाची उत्सुकता लागून राहिली! समकालीन मूल्य असलेला महेश एलकुंचवार लिखित आणि चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित “वाडा चिरेबंदी” आणि “मग्न तळ्याकाठी” या नाट्यप्रयोगांचा अनुभव एकदा घ्यायलाच हवा!
–योगिनी चौक
(लेखिका प्रसिद्ध नाट्य-मालिका कलावंत आणि लेखिका आहेत)