‘आय अम नॉट स्लमडॉग आय अम इंडियन’ हा आगामी मराठी चित्रपट यशाचं नवीन शिखर सर करण्यासाठी सज्ज झाला असून, बॉलिवूडमधील सध्याचा आघाडीचा गायक जावेद अलीने या चित्रपटासाठी गाणं गायलं आहे.
अलीकडच्या काही वर्षांमध्ये मराठी चित्रपटसृष्टीला पुन्हा सोनेरी दिवस आले आहेत असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही. देश-विदेशातील चित्रपट महोत्सवांमध्ये मराठीचा वाजणारा डंका… बॉक्स ऑफिसवर मराठी चित्रपटांनी घेतलेली गगनभरारी… अमराठी प्रेक्षकांसोबतच कलाकारांनाही लागलेली मराठीची ओढ… या आणि अशा बऱ्याच कारणांमुळे आज मराठी चित्रपटसृष्टी संपूर्ण जगाचं लक्ष वेधून घेण्यात यशस्वी ठरली आहे.
स्वास्तिक फिल्म्स इंटरनेशनलची प्रस्तुती असलेल्या ‘आय अम नॉट स्लमडॉग आय अम इंडियन’ या चित्रपटाची निर्मिती राजन डोगरा यांनी केली आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील तरूण, धडाडीचा अभिनेता युग यानेया चित्रपटाची कथा लिहिली असून दिग्दर्शनही केलं आहे. या चित्रपटासाठी जावेद अलीने ‘मुंबई साठी… मुंबईसाठी…’ हे गाणं गायलं असून यशराज स्टुडिओमध्ये या गाण्याचे ध्वनीमुद्रण करण्यात आलं आहे. हे गीत गीतकार युग यांच्या लेखणीतून आकाराला आलेलं असून, फेथ फाईव्ह या टीमने या गीताला संगीत दिलं आहे.
जावेद अलीने याविषयी माहिती देताना सांगितले, ‘या चित्रपटामधील गाणं अंतर्मुख होऊन विचार करायला लावणारं आहे. मुंबई स्वच्छ ठेवावी, सुंदर ठेवावी, असे आवाहन या गाण्यातून केले आहे. मुंबई ही माझी कर्मभूमी असल्याने हे गीत मला खूप भावले, जवळचे वाटले. बऱ्याच दिवसांनंतर असे वेगळे गीत गायला मिळाले, याचा मला खूप आनंद झाला. मला नेहमीच काहीतरी नवीन प्रयोग करायला आवडतात. या गीताच्या निमित्ताने गायन करताना शैलीत वेगळा प्रयोग केला आहे. त्यामुळे रसिकांना हे गाणं नक्कीच आवडेल.’
हा केवळ एक चित्रपट नसून प्रत्येक भारतीयाच्या मनात पेटलेला अंगार असल्याचं सांगत दिग्दर्शक युग म्हणाला, विदेशी लोकांना केवळ भारतातील गरीबीच दिसते. इथली गरीबी कॅश करण्याचा प्रयत्न केला जातो, पण माझा भारत असा नाही हे ‘आय अम नॉट स्लमडॉग आय अम इंडियन’ या चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळेल.
भारतासारखं सौंदर्य जगात कुठेही नाही, त्यामुळे आपलं सौंदर्य आपणच मांडायला हवं. या भावनेतून या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली असल्याचे निर्माते राजन डोगरा यांनी स्पष्ट केले.
कथा-पटकथा लेखन, दिग्दर्शन, संवादलेखन, गीतलेखन आणि नृत्य दिग्दर्शनाच्या जोडीला युगने या चित्रपटात मुख्य भूमिकाही साकारली आहे. त्याच्या जोडीला यात उषा नाडकर्णा, उदय सबनीस, राजन राणे, शामलाल नावत, उमेश बोळके, अजहर भट, नीलांबरी, दुर्गेश नाबर, तेजस मानकर, स्वकीत, स्वप्निल मोरे, अतुल, वामन परब, अनिल, कुणाल नाईक, शीतल कुलकर्णी, अमर गिरी, राजन, वेन्डोला, जॉय यांच्याही भूमिका आहेत. सुरेश देवन यांनी या चित्रपटाचं छायालेखन केलं आहे. कुणाल नाईक कार्यकारी निर्माता, एस. नंदागावले निर्मिती प्रमुख, तर संदिप कांबळे सहाय्यक आहेत. जीत कळके आणि प्रकाश मोरे यांनी या चित्रपटाचं पार्श्वसंगीत केलं आहे. बबन अडागळे यांनी कलादिग्दर्शन केलं असून महादेव दळवी यांनी रंगभूषा केली आहे. महेश नारकर या चित्रपटाचे वेशभूषाकार आहेत.