मिलिंद कवडे दिग्दर्शित उत्सुकता वाढवणारा थ्रीलरपट
काही मराठी सिनेमे अनोख्या शीर्षकामुळेही चर्चेत राहतात. अशाच वेगळ्या शीर्षकाचा मिलिंद कवडे दिग्दर्शित ‘१२३४’ येत्या ५ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. शीर्षकातच गुपित असलेल्या या सिनेमात मोठ्ठी स्टारकास्ट असून, ते रसिकांची उत्सुकता वाढवणार आहेत.
निर्माते कल्पेश पटेल यांच्या केपी सिनेव्हिजन आणि शैलेश पवार यांच्या शीतल फिल्म्स प्रॉडक्शन या बेनरखाली ‘1234’ या सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे. अनोख्या शीर्षकाप्रमाणेच या चित्रपटाचा विषयही वेगळ आहे. निर्माते कल्पेश पटेल आणि शैलेश पवार यांनी मनोरंजनाच्या माध्यमातून एक साधा सोपा विचार समाजासमोर मांडण्यासाठी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. त्याला दिग्दर्शक मिलिंद कवडे यांच्या कल्पक दिग्दर्शनाची साथ लाभली आहे.
‘1234’ची निर्मिती करताना केवळ सशक्त कथानकावरच भर देण्यात आला नसून तांत्रिकदृष्टया चित्रपट सक्षम व्हावा याकडेही बारकाईने लक्ष देण्यात आलं आहे. चित्रपटाची प्रत्येक फ्रेम आकर्षक व्हावी यासाठी विशेष मेहनत घेण्यात आली आहे. दर्जेदार निर्मितीमूल्यांना सहजसुंदर अभिनयाची सुरेख साथ लाभल्याने ‘1234’च्या रूपात प्रेक्षकांना एक परिपूर्ण चित्रपट पाहायला मिळेल असं मत निर्मात्यांनी व्यक्त केलं आहे.

दिग्दर्शक मिलिंद कवडे यांनी नेहमीच वेगळया विषयावर आधारित असलेल्या सिनेमांचं दिग्दर्शन केलं आहे. ‘1234’ हा चित्रपट म्हणजे त्या वाटेवरील पुढचं पाऊल आहे. या चित्रपटात नेमकं काय पाहायला मिळेल हे शीर्षकावरून तरी लक्षात येत नाही. याबाबत सांगताना मिलिंद कवडे म्हणाले, ‘1234’च्या कथेतील खरी गंमत मोठया पडद्यावर अनुभवनं प्रेक्षकांचा आनंद द्विगुणीत करणारी ठरेल. आजवर कधीही मराठी पडद्यावर न पाहिलेलं कथानक ‘1234’मध्ये पाहायला मिळेल याची खात्री देतो. सर्वच कलाकारांनी सुरेख अभिनय केल्याने शीर्षक आणि कथानकाला चार चांद लागले आहेत असं मी म्हणेन. आजवर मी नेहमीच नावीन्यपूर्ण प्रयोगांना प्राधान्य देत आलो आहे. त्यामुळे ‘1234’ हा चित्रपट बनवताना आता काय नवीन करायचं हा प्रश्न होता, पण कथानकातच नावीन्याचा खजिना असल्याने मी निर्धास्त झालो. ‘1234’च्या रूपात सर्वतोपरी परिपूर्ण असा चित्रपट बनवण्याचा प्रयत्न आमच्या टिमने केलेला आहे. प्रेक्षकांनाही तो नक्कीच आवडेल यात शंका नाही. विशेष म्हणजे हा सिनेमा केवळ मनोरंजनाकरीता नसून त्यात मनोरंजनाच्या माध्यमातून प्रबोधनही आहे, मेसेजही आहे.

दिग्दर्शनासोबतच ‘1234’ची कथा-पटकथाही मिलिंद कवडे यांनीच लिहिली आहे. याशिवाय सागर वानखेडेसोबत त्यांनी या चित्रपटाचं संवाद लेखनही केलं आहे. ‘1234’ या चित्रपटात भूषण प्रधान, प्रिया मराठे, संजय नार्वेकर, विजय पाटकर, गणेश यादव, यतिन कार्येकर, प्रदिप पटवर्धन, जयवंत वाडकर, विजय कदम, अरूण कदम, अनिकेत केळकर, मृणालिनी जांभळे, विशाखा सुभेदार, तेजा देवकर, संजय मोने, विजय मोरया, अभिजीत चव्हाण, किशोर चौगुले, अंशुमन विचारे, जगन्नाथ निवंगुणे, कमलेश सावंत, गुरू आनंद, प्रणव रावराणे आदी कलाकारांच्या भूमिका आहेत. ‘‘सुन्या सुन्या ओठांचे बोल सारे…’’ हे या चित्रपटातील एकमेव गीत असून कुणाल गांजावाला आणि आनंदी जोशी यांनी गायले आहे. गीतकार सचिन अंधारे यांनी लिहिलेलं हे गीत संगीतकार अमितराज यांनी संगीतबद्ध केले आहे.
हैदराबाद येथील रामोजी फिल्मसिटीमध्ये हे गीत भूषण प्रधान आणि अभिनेत्री प्रिया मराठे यांच्यावर चित्रीत करण्यात आले असून साऊथचे प्रसिद्ध कोरिओग्राफर बानू यांनी या गीताची कोरिओग्राफी केली आहे. सेन्टेनिओ टेरिझिओ यांनी या चित्रपटाच्या छायालेखनाचं काम केलं असून कलादिग्दर्शन संदिप कुंचीकोर्वे यांनी केलं आहे. वैभव वाघ या चित्रपटाचे कास्टिंग डायरेक्टर आहेत, तर वैशाली देशमुख यांनी या चित्रपटातील व्यक्तिरेखांच्या कॉस्च्युम डिझायनिंगचं काम पाहिलं आहे.