किशोर गोविलकर आणि हरी फुलवारे यांच्या प्रदर्शन

सुप्रसिद्ध चित्रकार किशोर गोविलकर आणि हरी फुलवारे यांचं ‘अनकॉट ब्युटी’ हे चित्र प्रदर्शन मुंबईच्या नेहरू सेंटर आर्ट गॅलरीमध्ये मांडण्यात आलं आहे. नेहरू सेंटर आर्ट गॅलरी, एसी गॅलरी, डिस्कव्हरी ऑफ इंडीया बिल्डींग, डॉ. ऍनी बेझंट मार्ग, वरळी, मुंबई या ठिकाणी दि. ९ ते १५ ऑगस्ट २०१६ या काळात सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत सदर प्रदर्शन सर्व रसिकांसाठी विनामुल्य खुलं राहील.

किशोर गोविलकर आणि हरी फुलवारे यांची ही चित्रं पहाताना त्यातला साधेपणा आणि प्रसन्नता आपल्या मनाला मोहिनी घालतात. वेगवेगळे विषय, माध्यम आणि शैली असलेली ही चित्रं ग्रामिण भागाचं सुंदर दर्शन घडवतात.
चित्रकार किशोर गोविलकर यांनी कोकणातील देखण्या निसर्गाबरोबरच तिथल्या धनगर समाजातील व्यक्तींची पोर्ट्रेटस साकार केली आहेत. यामधाली काही चित्रं ही चित्रकाराच्या कल्पनाशक्तिमधून आली असून काही प्रत्यक्ष दृश्यावर आधारीत आहेत. निसर्ग हा बहुतांश कलाकारांच्या कलेचा विषय असला तरी किशोर गोविलकर यांनी चितारलेल्या प्रत्येक चित्रात जिवंतपणा असून त्याला जीवनाचा स्पर्श झाला आहे. भव्य पर्वतामागे मावळतीला जाणारा सुर्य, खेड्यातील रेंगाळलेली दुपार, समुद्र किनार्यावर कामात मग्न असलेले मच्छिमार असे अनेक देखावे त्यानी सादर केले आहेत.

चित्रकार हरी फुलवारे हे मुंबई जवळच्या कर्जत इथले रहिवासी आहेत. सुंदर निसर्ग, देखण्या बागा, डौलदार बैलांची बैलगाडी, फुल विक्रेती मुलगी, लेकुरवाळी माय, शांत समुद्र किनार्यावरची गावं, अलिबाग मधली जीवन संकृती अशी अनेक चित्रं त्यानी साकार केली आहेत. तैल रंग आणि एक्रिलिक रंगातील ही अनोखी चित्र ग्रामिण भागातील सौंदर्याचा पुरेपूर आनंद देतात.

फुल तोडणारी बालिका, पाण्याच्या प्रवाहात मासेमारी करणारी मुलं, नांगरणी करणार शेतकरी आणि बैल अशी चित्रं त्यामधल्या छाया-प्रकाशाच्या अप्रतिम देखाव्यामुळे आपल्याला मोहीत करतात. चित्रकारीतेचं कोणतही लौकीक शिक्षण न घेता जन्मजात आवडीमधून त्यानी ही चित्रं साकार केली आहेत. असामान्य निरिक्षण शक्ति, मार्गदर्शन आणि मेहनतीमधून त्यानी हे यश संपादन केलं आहे.