सहा रंगलेखकांच्या कलाकृती जहांगीरमध्ये
सहा प्रथितयश चित्रकारांनी अलिकडच्या काळात साकार केलेल्या चित्रांचं ´मिस्टीक सिक्स’ हे चित्रप्रदर्शन जहांगीर आर्ट गॅलरी, १६१-बी, महात्मा गांधी मार्ग, काळा घोडा, मुंबई येथे मांडलं आहे. सदर प्रदर्शन दि. ९ ते १५ ऑगस्ट २०१६ या काळात सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत खुलं राहील.

धिरज पाटील यांनी बाल्य ते किशोरवयीन टप्प्याचं भावभावनांचं दर्शन त्यांच्या चित्रांमधून घडवलं आहे तर मनोज पवार यांच्या ऍक्रिलिक रंगातील चित्रांत अक्षरांना महत्व असून त्यातील ध्वनी कंप चित्रांमधूनही जाणवतो. शिवशक्तीची अविनाशी आणि अपार प्रभा सनी घरत यांच्या चित्रात पहाता येते. त्यानी ही चित्रं अर्ध मुर्त स्वरूपात साकार केली आहेत. संदीप परांगे यांनी गतकाळाच्या आठवणी जागवणारं घर आणि हिरवंगार परिसर आपल्या जलरंगातील देखण्या चित्रात सादर केलं आहे. राजेश धंगाडा यांनी आदिवासींची वारली चित्रकला अनोख्या स्वरुपात पेश केली आहे तर योगेश सांबरे यांनी रम्य स्वप्नवत वाटणारी फॅंटसी त्यांच्या चित्रांमधून सादर केली आहे.