स्वातंत्र्यदिनानिमित्त ‘लेफ्ट राईट लेफ्ट’चा प्रयोग
तळागाळातील लोकांसाठी कार्य करणारी ‘सावली’ ही एक सामाजिक संस्था यंदाचा ६९ वा स्वतंत्र्यादिन वेगळ्या प्रकारे साजरा करत आहे. स्वातंत्र्यदिनानिमित्त सावली संस्था प्रथमच “जरा याद करो कुर्बानी” या कार्यक्रमाचे आयोजन करत आहे.
भांडूपमधील सर्व आजी माजी पोलीस अधिकारी, निवृत्त लष्कर अधिकारी आणि अग्निशमन दलाचे जवान यांचा सन्मान करून त्यांनी केलेल्या देशसेवेला मानवंदना देणार आहे. देशाच्या सुरक्षेसाठी चोवीस तास ऑन ड्युटी असणाऱ्या जवानांचा सत्कार भारताच्या स्वातंत्र्यदिनी करणे म्हणजे त्यांचा कार्याला खऱ्या अर्थाने सन्मानित करणे आहे, अशी भावना सावलीचे संस्थापक गणेश जाधव यांनी व्यक्त केली.
सावलीचे संस्थापक गणेश जाधव यांच्या हस्ते भांडूप येथील तुळशेत पाडा मनपा शाळेत १५ ऑगस्ट रोजी, सकाळी ११ वाजता आजी माजी सैनिकांचा सत्कार करण्यात येणार आहे. तसेच सकाळी शाळेच्या पटांगणात विभागातील जेष्ठ नागरिकाच्या हस्ते झेंडावंदन करण्यात येईल.
राष्ट्रवाद की नक्षलवाद अशा संवेदनशील विषयावर आधारित महाविद्यालयीन तरुण प्रसाद थोरवे लिखीत/दिग्दर्शित ‘लेफ्ट राईट लेफ्ट’ या दीर्घअंकी नाटकाचा प्रयोग सादर करतील.