‘सरोगसी’वर कलात्मक भाष्य
काही चित्रपट शीर्षकाचा तंतोतंत आशय मांडणारे असतात, तर काही शीर्षकाच्या अनुषंगाने येणाऱ्या विषयांनाही अधोरेखित करीत प्रेक्षकांच्या मनावर ठसा उमटवण्याचा प्रयत्न करीत असतात. १९ आगस्टला प्रदर्शित होणारा ‘तो आणि मी’ हा सिनेमाही याच पठडीतला आहे.

यश क्रिएशनच्या बेनरखाली निर्माते अंकुश विठ्ठल सुतार यांनी ‘तो आणि मी’ची निर्मिती केली आहे. हा चित्रपट वरकरणी केवळ एक प्रेमकथाच मांडणारा असावा असं जरी वाटत असलं तरी सामाजिक जाणिवेचं भान राखून एक महत्त्वाचा मुद्दाही या चित्रपटात हायलाईट करण्यात आला आहे.
प्रेम म्हणजे दोन मनांचं मिलन. काहींच्या प्रेमाचं रूपांतर खरोखर मिलनात होतं, तर काहींची स्वप्न अधुरीच राहतात. पण मिलन झाल्यानंतरही पुढे काही समस्या उद्धभवू शकतात. या परिस्थितीत जे टिकतं ते खरं प्रेम असतं. हाच एक महत्त्वाचा धागा पकडून दिग्दर्शक मुकेश मलिक यांनी सुनील हरिश्चंद्र यांच्या साथीने ‘तो आणि मी’ या चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवादलेखन केलं आहे.
मुकेश आणि सुनील यांनी या चित्रपटात आजच्या काळातील सरोगसी हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा हाताळला आहे. आजवर काही मोजक्याच चित्रपटात सरोगसीसारखा मुद्दा अधोरेखित करण्यात आला आहे. या चित्रपटात हा विषय एका वेगळया दृष्टिकोनातून आणि परिपूर्णपणे मांडण्यात आला आहे. केवळ समाज प्रबोधन न करता सरोगसीसारखा मुद्दा पडद्यावर मांडताना प्रेक्षकांचं मनोरजन होईल याची परिपूर्ण व्यवस्था करण्यात आली आहे. प्रेमकथेचा सुमधूर गीत-संगीताची किनारही जोडण्यात आली आहे. त्यामुळे हा चित्रपट सर्व वयोगटातील प्रेक्षकांना आपलासा वाटणारा आहे. दिग्दर्शक मुकेश मलिक आणि सुनिल हरिश्चंद्र यांनी लिहिलेल्या गीतांना संगीतकार असलम केयी यांनी संगीत दिलंं आहे.

सुनिल हरिश्चंद्र यांच्या साथीने मुकेश मलिक यांनी या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद, गीतलेखन केलं आहे. सुबोध भावे, गिरिजा जोशी, श्वेता शिंदे, प्रसाद ओक, प्रसाद पंडित, ज्योती म्हाळसे, माधव वझे, रमा जोशी, स्मिता पाटकर, बालकलाकार दीप सुतार आदी कलावारांच्या अभिनयाने नटलेल्या या चित्रपटात अभिनेत्री स्मिता गोंदकर पाहुण्या भूमिकेत दिसणार आहे.

संकलन छत्रपाल निनावे यांनी केलं असून असलम केयी यांनी या चित्रपटातील गीतांना संगीत दिलं आहे. राजेश गमरे यांनी कोरिओग्राफी केली असून तेच या चित्रपटाचे प्रॉडक्शन मॅनेजर आहेत.
गणेश डुंबरे कार्यकारी निर्माते असून चैत्राली डोंगरे यांनी या चित्रपटातील व्यक्तिरेखांच्या कॉस्च्युम डिझायनिंगचे काम केलं आहे. केमेरामन अनिल चंदेल आणि शुभ्रा दत्ता यांनी छायालेखन केलं असून सादिक अली यांनी कलादिग्दर्शनाची जबाबदारी पार पाडली आहे.