१९ ऑगस्टपासून सर्वत्र प्रदर्शित होणार
‘आय एम नॉट स्लमडॉग आय एम इंडियन’ हा मराठी चित्रपट येत्या १९ ऑगस्टपासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. स्वस्तिक फिल्म्स इंटरनेशनल प्रस्तुत या चित्रपटाची निर्मिती राजन डोगरा यांनी केली आहे. अभिनयासोबतच दिग्दर्शनाकडे वळलेल्या युगने या चित्रपटात भारतातील वास्तव दाखवले आहे.

निर्माते राजन डोगरा यांनी सांगितले, की आपल्याकडे जे चांगलं आहे त्याचं दर्शन या चित्रपटात प्रेक्षकांना घडेल. एका आशयघन कथानकाला गीत-संगीत आणि अभिनयाची जोड देऊन हा चित्रपट बनवण्यात आला आहे. मनोरंजनासाठी लागणारा संपूर्ण मसाला जरी या चित्रपटात असला तरी हा केवळ मसालापट नाही. यात एक संदेशही दडलेला आहे. याच कारणामुळे सर्व गटातील प्रेक्षकवर्गाला हा चित्रपट आपलासा वाटेल. युगने अभिनयासोबत दिग्दर्शन करीत संपूर्ण टिमला घेऊन एक दर्जेदार चित्रपट बनवला आहे. आजच्या तरुणाईला पाठिंबा दिला तरच त्यांच्यात दडलेले कलागुण जगासमोर येतील. हा चित्रपट अनेक तरुणांसाठी मार्गदर्शन करणारा ठरेल याबाबत शंका नाही.

सुरेश देवन यांनी या चित्रपटाचं छायालेखन केलं आहे. कुणाल नाईक कार्यकारी निर्माता, एस. नंदागावले निर्मिती प्रमुख, तर संदिप कांबळे सहाय्यक आहेत. जीत कळके आणि प्रकाश मोरे यांनी या चित्रपटाचं पार्श्वसंगीत केलं आहे. बबन अडागळे यांनी कलादिग्दर्शन केलं असून महादेव दळवी यांनी रंगभूषा केली आहे. महेश नारकर या चित्रपटाचे वेशभूषाकार आहेत.