विनोद आणि गांभीर्याचा उत्तम समतोल

खास ‘रंगमैत्र’साठी ‘इस कंबख्त साठे का क्या करे?’ या नाट्यप्रयोगाबद्दल प्रसिद्ध सिने-नाट्य आणि टीव्ही मालिका कलावंत, लेखिका श्वेता पेंडसे यांनी व्यक्त केलेले मत…
आजचे युग स्पर्धेचे युग आहे. प्रगतीपथावर जाताना प्रत्येकालाच वेगवेगळ्या पातळ्यांवर असंख्य स्पर्धांना सामोरे जावे लागते. इतका खटाटोप करूनही यश पदरात पडेलच याची काहीही शाश्वती नसल्याने मनस्तापही वाढतच राहतो. बाहेरच्या जगापासून सुरू झालेली ही स्पर्धा कधी तुम्हाला अंतर्बाह्य व्यापून टाकते, हे तुम्हालाही कळत नाही आणि अखेर एका क्षणी आपण चक्क स्वतःशीही स्पर्धा करु लागतो. हा सगळा प्रवास आणि त्यातून उद्भवणारे आव्हानात्मक प्रसंग “इस कंबख्त साठे का क्या करे?” या नाटकात तंतोतंत मांडले आहेत.

अभय आणि सलमा हे एक आजच्या काळातलं छान जोडपं. अभय हा स्वतःला मिळालेल्या यशावर समाधानी नसणारा एक तरूण अॅड फिल्ममेकर. सलमा ही व्यवसायाने प्रोफेसर. या दोघांची कामाचे क्षेत्रे भिन्न तशीच त्यांची व्यक्तिमत्वेदेखिल!
अभयचा कायम आपल्या कामाच्या बाबतीत रडका सूर. ‘साठेची लायकी नसतानाही त्याला नेहमी माझ्यापेक्षा जास्त यश आणि पसंती मिळते’ ही त्याची तक्रार अगदी नेहमीचीच! कुठेतरी स्पर्धा ही माणसाला आणखी चांगलं काम करण्यास मदत करत असते, मात्र अभयच्या आयुष्यात त्याच्याही नकळत या ‘साठे’चं स्थान त्याच्या कामापेक्षाही वरचं होऊन जातं. अभयची बायको सलमा मात्र स्वतःच्या कामात आनंद शोधणारी आणि या पोकळ स्पर्धांपासून कोसो दूर! सलमा त्याची ही मानसिक अवस्था समजून घेते आणि प्रत्येकवेळी त्याला त्यातून बाहेर पडण्यास आणि उत्तम काम करण्यास प्रोत्साहन देते. अभयला तिचे म्हणणे पटतेही… मात्र, अंतर्मनाचा ठाव घेणे भल्याभल्यांना जमत नाही. तेच अभयच्या बाबतीत होते. त्याच्या मनात त्यानेच हिमालयापेक्षाही मोठा करून ठेवलेला हा ‘साठे’ अखेर अभयला त्याच्या तत्वांशीही तडजोड करायला भाग पाडतो. सलमाचे सामंजस्यही तेथे पराभूत होते आणि शेवटी नाटकाला एक अत्यंत अनपेक्षित कलाटणी मिळते. त्यासाठी प्रयोग बघणेच उत्तम!

रसिकाने सलमाच्या भूमिकेत झीशानला उत्तम साथ दिली आहे. कोणताच ताण नसलेली आनंदी आणि खेळकर सलमा तिने छान उभी केली आहे. नवरा बायकोतील खूप छोटे, पण गोड प्रसंग यांनी आपल्या सहज आणि नैसर्गिक अभिनयातून खुलवले आहेत.

नाटकाचे दिग्दर्शन छान आहे यात वाद नाही. तरीही रसिकाचे दिग्दर्शन म्हटल्यावर आपोआपच अपेक्षा वाढतात आणि म्हणूनच काही गोष्टी चट्कन खटकतात. प्रकर्षाने खटकतात त्या दोन्ही पात्रांच्या काही प्रसंगी होणाऱ्या अनावश्यक हालचाली. ही दोघे या घरात एकटीच राहतात. दोघेही एकमेकांशी भरपूर गप्पाही मारतात. पण काही ठिकाणी अभय अत्यंत गंभीर विषयवार बोलत असतानादेखील सलमा घरभर इकडून तिकडे या ना त्या कारणाने फिरत असते. त्याचे बोलणे सलमासाठी नेहमीचे असले तरी प्रेक्षकांसाठी नाही. या हालचालींमुळे त्याच्यावरील ‘फोकस’ हलतो. अनेकदा ती पुस्तक हातात घेते आणि दोन ओळीही न वाचता ठेवून देते. मग त्या दोन ओळींसाठी ते पुस्तक घेणे-ठेवणे या हालचाली त्रासदायक वाटतात. वारंवार बसण्याच्या जागा बदलणे हेही अत्यंत अनैसर्गिक वाटते. रसिकाचा अभिनय निदान या नाटकात तरी या हालचालींमध्येच अडकून पडला की काय? असे वाटू लागते. नवोदित कलाकारांसाठी अशी बांधणी ठीक आहे. पण रसिका आणि झीशान यांच्यासारख्या ताकदीच्या कलाकारांनी २०-२० मिनिटे एकाच जागी बसूनही प्रसंग केला, तरीही ते प्रेक्षकांना धरून ठेवू शकतात. शिवाय या नाटकात असे प्रसंग आहेत, मग त्याचा वापर का करू नये? शिवाय रंगमंचाचा बराचसा भाग, जसे बाल्कनी आणि डायनिंग टेबल जास्तीत जास्त वेळ वापरलाच जात नाही. बाल्कनीचा वापर अत्यंत सुरेख करता येईल, असे खूप प्रसंग नाटकात आहेत.
‘इस कंबख्त साठे का क्या करे?’ ह्यासारखी नाटकं वर-वर बघता फार सहज वाटत असली तरी अतीसहजता हाच त्यातला क्लिष्ट भाग असतो. या नाटकाचा विषय गंभीर असला तरी विनोदाची एक हलकी किनार त्यात आहे. अश्यावेळी विनोद आणि गांभीर्य या दोहोंचा समतोल सांभाळणे हे केवळ दिग्दर्शकच नाही तर प्रत्येकासाठीच एक आव्हान असते. पण सूत्रधार मिलिंद फाटक यांच्यापासून सबंध चमूने हे आव्हान यशस्वीरीत्या पेलले आहे.
नाटक संपल्यावर प्रेक्षागृहातील प्रत्येक अभय आपल्या मनातील साठेला कायमचा निरोप देऊन आणि प्रत्येक सलमा आपल्या अभयला ‘सलमा’सारखंच समजून घेण्याचा निश्चय करून बाहेर पडतात, हेच या सादरीकरणाचे यश आहे. पुढील प्रयोगांकरिता बीइंग असोसिएशनला मनःपूर्वक शुभेच्छा!
-श्वेता पेंडसे
sapendse@gmail.com