विकृत मानसिकतेवर कलात्मक प्रहार

खास ‘रंगमैत्र’साठी ‘म्युझियम ऑफ स्पीशीज इन डेंजर’ या नाट्यप्रयोगाबद्दल प्रसिद्ध सिने-नाट्य आणि टीव्ही मालिका कलावंत, लेखिका श्वेता पेंडसे यांनी व्यक्त केलेले मत…
स्त्री-स्वातंत्र्याबद्दल आणि त्यांच्या अधिकाराबद्दल नेहमीच हिरीरीने भाष्य केले जाते, मोठमोठ्या मंचांवरून लांबलचक भाषणे दिली जातात… सभा घेतल्या जातात. ह्या साऱ्याचा उपयोग किती होतो हा भाग अलाहिदा….कारण हे सगळे प्रश्न अजूनही कायम आहेत. स्त्री अजूनही समाजात सुरक्षित नाही, याची जाणीव करून देणाऱ्या घटना घडतच आहेत.

नावासकट संपूर्ण प्रयोगच विलक्षण आहे. निर्भयासोबत झालेल्या दुर्दैवी घटनेनंतर समाजाची कानउघाडणी करण्याच्या हेतूने रसिका आगाशे आणि सुमेध कुलकर्णी यांनी हे नाटक लिहिले. त्याचे काही प्रयोग झाल्यावर ते बंद करायचे असेही ठरले होते, कारण हे सगळे कुठेतरी थांबेल, समाजात सकारात्मक बदल दिसेल अशी भाबडी आशा लेखक-दिग्दर्शक रसिका आगाशे आणि या नाटकाच्या चमूला होती. पण अश्या घटनांचे प्रमाण कमी न होता वाढतच गेले आणि अर्थातच या नाटकाचे प्रयोग जास्तीत जास्त प्रमाणात करायचे असे ठरले.
सव्वा तासाच्या या सादरीकरणाला फक्त – ‘एका उदात्त हेतूने केले गेलेले नाटक’ असे म्हणता येणार नाही. हे त्याही पलीकडचे काहीतरी आहे. लेखन, मांडणी, सादरीकरण सगळेच चपखल, कमालीचे वेगळ्या शैलीचे आहे!
एखाद्या म्युझियममध्ये जसे अत्यंत प्राचीन वस्तूपासून अगदी अलीकडच्या चमत्कारिक किंवा अनमोल वस्तूपर्यंत सगळे मांडले असते, तसेच हे नाटक म्हणजे प्राचीन काळापासून अगदी आजच्या काळातल्या स्त्रीमनाचे म्युझियम आहे. मात्र यात म्युझियमच्या काचेच्या पलीकडे जाऊन लेखक आणि दिग्दर्शकाने स्त्रीमनाचा अचूक ठाव घेतला आहे. स्त्रीची कुचंबणा, खोलवर कैद असलेल्या भावना, तडफड, घुसमट आणि या साऱ्यावर मात करून पुन्हा तितक्याच ताकदीने उभं राहण्याची जिद्द, हे सारे अलगद उलगडून ठेवले आहे.
अन्याय करणे जसे चूक आहे तसेच तो सहन करणे हीदेखिल चूकच! पण, ‘तुम्ही चुकता आहात’ ही गोष्ट कोणाच्याही गळी उतरवणे सोपे नसते. विशेष म्हणजे जेव्हा ती चूक करोडो लोकांचा समाज करत असतो. अश्यावेळी ती गोष्ट विशेष पद्धतीने सांगितली जायला हवी असते. या नाटकाच्या प्रक्रियेमध्ये सहभागी असलेला प्रत्येक जण जणू हे पटवून देण्यासाठीच जन्माला आला आहे, अशा पोटतिडकीने हे नाटक सादर करतो.

या नाटकाचे लेखन आणि दिग्दर्शन उत्कृष्ट आहेच. वादच नाही. पण किरण खोजे, नेहा सिंग, टीना भाटीया, पूर्वी भावे आणि मनीषा मल्होत्रा या पाचही मुली आपल्या जबरदस्त अभिनयाने हे नाटक एका वेगळ्याच उंचीवर घेऊन जातात. फैझ मोहम्मद आणि अजित पालावत हेही त्यांना उत्तम साथ देतात. या दोघांच्या खड्या आवाजातील गायकीने प्रसंग उठावदार होतात. कितीतरी प्रसंग उत्तम नृत्यातून या मुली जिवंत करतात, आपल्या सकस अभिनयातून तुम्हाला हसवतात आणि घळघळा रडायलाही भाग पाडतात.
पाच पतींना सांभाळताना होणारी द्रौपदीची तारांबळ ते परीक्षा गृहात अॅसिड अटॅक झालेल्या कोवळ्या मुलीच्या मनाच्या होणाऱ्या चिंधड्या, हे सारेच प्रसंग मनाला भिडतात. प्रत्येक प्रसंगानुरूप बदलणारी वेशभूषा, रंगभूषा सारे हेच कलावंत तिथल्यातिथे अतिशय सफाईने करतात. एकेक घटना दाखविताना एल.सी.डी. स्क्रीनचादेखिल अत्यंत कल्पकतेने वापर केला जातो. एकेका गोष्टीचे कौतुक करावे तेवढे थोडे!
हे नाटक करण्यासाठी अभिनय, गायन, वादन याहीपेक्षा काही गरजेचे आहे तर ती म्हणजे समाजासाठी काहीतरी चांगलं करण्याची प्रबळ इच्छा आणि स्त्रीची वेदना समजून घेण्यास आवश्यक असलेली संवेदनशीलता! कमीतकमी नेपथ्य, प्रकाश आणि संगीत असूनही, फक्त उत्तम संहिता, प्रगल्भ दिग्दर्शन आणि दमदार अभिनयाच्या जोरावरदेखिल तितकेच परिणामकारक सादरीकरण होऊ शकते हे रसिकाने या नाटकातून दाखवून दिले आहे.
विशेष नमूद करावयाचे आहे ते हे, की या नाटकाच्या प्रयोगांमागे कोणताही व्यावसायिक हेतू न ठेवता निव्वळ सामाजिक बांधिलकीपोटी हा प्रयोग बीइंग असोसिएशन करते. यातील कलावंतदेखिल या प्रयोगाचे मानधन घेत नाहीत आणि हे इतक्या आवर्जून का नमूद केले याची जाणीव हा प्रयोग बघून, त्यांनी घेतलेली प्रचंड मेहनत बघून नक्कीच होईल.
कोणत्याही संस्थेसाठी, कोणत्याही मंचावर फक्त मूळ खर्च घेऊन हा प्रयोग सादर करण्यास बीइंग असोसिएशन तयार आहेत. ‘आपली करमणूक होते आहे’, असं समजून हे नाटक बघायला बसलेल्या लोकांना, ‘आपण एका षंढ समाजाचे घटक आहोत’ या दाहक जाणिवेपर्यंत दिग्दर्शक रसिका आगाशे अत्यंत बेमालूमपणे घेऊन जातात आणि बघणारा प्रत्येक जण सुन्न होऊन बाहेर पडतो. बरेच दिवसांनी काहीतरी बघून अस्वस्थही व्हायला झालं आणि समाधानसुद्धा मिळालं. ही अनुभूती फारच दुर्मिळ! प्रत्येकाने बघावा आणि दाखवावा असा नाट्यप्रयोग. निर्विवाद!
-श्वेता पेंडसे