मनोरंजनातून प्रबोधन करणारा एकपात्री कार्यक्रम
हास्य प्रबोधनकार संजीवन म्हात्रे यांचा मनोरंजनातून प्रबोधन करणारा ‘याल तर हसाल’ हा एकपात्री प्रयोग लोकप्रिय होत असून, तो ७०० प्रयोगांपर्यंत पोहोचतो आहे.

आजचा काळ प्रचंड मानसिक ताण-तणावाचा आहे. सगळ्या क्षेत्रात स्पर्धा वाढल्याने विद्यार्थी व पालक तणावात असतात. महागाईमुळे सर्वसामान्य माणसाला जगणे असह्य झाले आहे. आधुनिकतेच्या नावाखाली चंगळवाद वाढला आहे पण उत्पन्नाअभावी खर्चाचा मेळ बसत नसल्यामुळेही ताण–तणाव वाढत आहेत. अशा या लोकांना तणावमुक्त करण्याचा संजीवन म्हात्रे ‘याल तर हसाल’ या कार्यक्रमातून प्रयत्न करत आहेत.
संजीवन म्हात्रे यांचा “याल तर हसाल” हा प्रत्येकाला हसत हसत अंतर्मुख करायला लावणारा तसेच आगरी भाषेला एका विशिष्ट उंचीवर नेवून ठेवणारा प्रयोग आहे. ज्यांना आगरी भाषा चटकन लक्षात येत नाही त्यांनाही हा प्रयोग सहज समजतो हे त्यांच्या सादरीकरणाचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल.
प्रबोधन म्हटले की लोकांना थोडे अवघड वाटते. कारण उपदेशाचे डोस असतील असा समज असतो. पण हे प्रबोधन मनोरंजनातून सहजपणे घडते. अडीच तास गायन, अभिनय आणि वक्तृत्व याचे सहजसुंदर दर्शन या प्रयोगात घडते. यातील विनोद, कविता आणि त्याच्या सादरीकरणाला एकूणच लोककलेचा, लोकसंस्कृतीचा वारसा आहे. आपल्याकडे भारुड, कीर्तन, गोंधळ असे अनेक फॉर्म नाटकांसाठी वापरले गेले आहेत. हे सगळे फॉर्म प्रबोधन प्रकारातील आहेत. तसाच प्रबोधन आणि मनोरंजनाचा हा नवा फॉर्म संजीवन म्हात्रे यांनी निवडला आहे.
