स्वातंत्र्यदिनानिमित्त ‘जरा याद करो कुर्बानी’
तळागाळातील लोकांसाठी कार्य करणारी मुंबईतील ‘सावली’ या सामाजिक संस्थेने यंदाचा ६९ वा स्वातंत्र्यादिन वेगळ्या प्रकारे साजरा केला. स्वातंत्र्यदिनानिमित्त ‘जरा याद करो कुर्बानी’ या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. भांडूपमधील सर्व आजी माजी पोलीस अधिकारी, निवृत्त लष्कर अधिकारी आणि अग्निशमन दलाचे जवान यांचा सन्मान करून त्यांनी केलेल्या देशसेवेला मानवंदना दिली.
देशाच्या सुरक्षेसाठी चोवीस तास ऑन ड्युटी असणाऱ्या जवानांचा सत्कार भारताच्या स्वातंत्र्यदिनी करणे म्हणजे त्यांचा कार्याला खऱ्या अर्थाने सन्मानित करणे आहे, त्याचबरोबर ‘लेफ्ट राईट लेफ्ट’ या नाटकाद्वारे राष्ट्रवाद ही संकल्पना लोकांपर्यंत पोहोचविणे हा उद्देश आमचा होता, अशी भावना सावलीचे संस्थापक गणेश जाधव यांनी व्यक्त केली.
सावलीचे संस्थापक गणेश जाधव यांच्या हस्ते भांडूप येथील तुळशेत पाडा मनपा शाळेत आजी माजी सैनिकांचा सत्कार करण्यात आला. राष्ट्रवाद की नक्षलवाद अशा संवेदनशील विषयावर आधारित महाविद्यालयीन तरुण जागर कलामंच निर्मित आणि प्रसाद थोरवे लिखीत/दिग्दर्शित ‘लेफ्ट राईट लेफ्ट’ या दीर्घअंकी नाटकाचा प्रयोग सादर केला.