स्मिता तांबे, विजय मिश्रा करणार अभिवाचन
लोकांमध्ये उत्तम साहित्याची आवड निर्माण होऊन ते लोकांपर्यंत पोहोचावे व एकूण साहित्याबद्दल अभिरुची निर्माण व्हावी, या उद्देशाने ‘चला, वाचू या’ या अभिवाचन उपक्रमाचा दुसर्या वर्षातला पहिला कार्यक्रम रविवार २८ ऑगस्टला संध्याकाळी ५ वाजता प्रभादेवी येथील पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीमध्ये होत आहे.

दुसऱ्या वर्षातील पहिल्या सत्रात प्रसिध्द अभिनेत्री स्मिता तांबे, अभिनेते विजय मिश्रा, राज्याच्या भाषा संचालिका मंजुषा कुलकर्णी आणि ज्येष्ठ रंगकर्मी प्रमोद लिमये गुंफत आहेत.
व्हिजन आणि पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या संयुक्त विद्यमाने जून २०१५ मध्ये ‘चला, वाचू या’ हा उपक्रम सुरु करण्यात आला. दर महिन्याला सलग उपक्रम स्वरुपात सुरु झालेला आणि यशस्वी वर्षपूर्ती झालेला अभिवाचनाचा हा मुंबईतील पहिला उपक्रम आहे. अवघ्या वर्षभरात या उपक्रमाला रसिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला.
आजवर या उपक्रमामध्ये ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर, अभिनेते व कवी किशोर कदम ‘सौमित्र’, संगीतकार कौशल इनामदार, दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी, ज्येष्ठ साहित्यिका उषा मेहता, साहित्यिक अनंत भावे, अभिनेते विजय कदम, राजन ताम्हाणे, शैलेश दातार, सुशील इनामदार, शर्वाणी पिल्ले, मानसी कुलकर्णी, प्रसिध्द कवी व कोकण मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष डॉ. महेश केळुसकर, किरण येले, भक्ती रत्नपारखी, लेखक-दिग्दर्शक कौस्तुभ सावरकर, वृत्तनिवेदिका प्राजक्ता धर्माधिकारी, शुभांगी सावरकर, हेमंत बर्वे, ज्येष्ठ लेखक रवी लाखे, पुणे एसएनडीटी कॉलेजच्या मराठी विभागप्रमुख डॉ. प्रिया जामकर, अभिनेते अभिजीत झुंजारराव, वृत्तनिवेदक विजय कदम आदींसह अनेक मान्यवरांनी यापूर्वीची अभिवाचन सत्रे गुंफली आहेत.

साहित्यप्रसाराबरोबरच वाचिक अभिनयाकडेदेखील जाणीवपूर्वक लक्ष वेधण्याचा प्रयत्न करणे हा या उपक्रमाचा हेतू आहे. गेल्या वर्षभराच्या कालावधीत अनेकांना वाचनाकडे वळवण्यात आणि आवडीने पुस्तक खरेदी करुन ते वाचण्याची आवड निर्माण करण्यात आल्याचे आयोजक सांगतात. नव्या कलावंतांनादेखील या उपक्रमात अभिवाचन करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करुन देण्यात आले आहे.

या निमित्ताने वाचन चळवळ वृध्दींगत करण्याच्या उद्देशाने अभिवाचनाचे एक कायमस्वरुपी व्यासपीठ निर्माण करण्याचा प्रयत्न असून त्यासाठी रसिकांना विनामूल्य प्रवेश असतो. या अभिवाचन कार्यक्रमास रसिकांनी बहुसंख्येने उपस्थित राहून उपक्रमाचा प्रसार व वृध्दी करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन व्हिजनचे संचालक श्रीनिवास नार्वेकर यांनी केले आहे.